Monday 19 December 2011

वेबसाईटवरून खोटे पॅकेज विकून फसवणूक

हिंगोली -  मुंबईच्या बांद्रा भागात आर्यरूप टूरिझम ऍण्ड क्‍लब रिसोर्ट कंपनीच्या नावाखाली तीन महिन्यांत रक्‍कम तिप्पट करून देण्याचे पॅकेज विकून पंचवीस लाखांची फसवणूक केल्याबद्दल पुणे, कोल्हापूर व चंद्रपूर भागातील तेरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली तालुक्‍यातील निशाणा येथील श्रीराम शेषराव जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - मुंबई येथील बांद्रा ईस्ट भागात सातारा जिल्ह्यातील खटाव येथील आरोपी रवींद्र देशमुख व वसुंधरा रवींद्र देशमुख यांच्यासह काही जणांनी आर्यरूप टुरिझम ऍण्ड क्‍लब रिसोर्ट ही कंपनी उघडली. त्यानंतर या कंपनीने www.airrupa.in ही वेबसाईट उघडली. आरोपी विश्‍वासराव देशमुख (मुंबई), रामचंद्र थोरात (पुणे), पुंडलिक इंगळे (सोलापूर), अतुल बाबाराव जाधव, कल्पना अतुल जाधव (चंद्रपूर), राहुल वाणी ऊर्फ राहुल पाटील (कोल्हापूर) यांच्यासह पाच संशियातांनी या वेबसाईटवरून पॅकेजची विक्री केली. या वेबसाईटवर कंपनीच्या स्कीमची प्रसिद्धी केली. त्यामध्ये नऊ हजार रुपये भरल्यास नव्वद दिवसांत सत्तावीस हजार रुपये मोबदला देणारी पॅकेज प्रदर्शित केले. यासोबतच पंचवीस हजार, पन्नास हजार, एक लाख, दीड लाख, तीन लाख व पाच लाख याप्रमाणे पॅकेज नव्वद दिवसांत तीनपट करून दिले जातील असे जाहीर केले. या स्कीममध्ये फिर्यादीसह परसराम मोरे (मसोड), नीळकंठ नामदेवअप्पा कापसे (लासिना) आदींनी हिंगोलीच्या बॅंक ऑफ बडोदामध्ये काम करणाऱ्या अतुल जाधव याच्यामार्फत पॅकेजमध्ये सहभाग घेतला.

त्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी दीड हजार रुपये भरले. नंतर पॅकेजच्या रकमा जमा केल्या. नंतर नव्वद दिवसांचा कालावधी लोटल्यावर संबंधित खातेदाराच्या खात्यावर रकमा जमा झाल्याच नाही तेव्हा फिर्यादी श्री. जाधव यांनी मुंबई येथे जाऊन कंपनीच्या कार्यालयात भेट घेतली. तेव्हा तेथील अधिकारी राजेश पांडे यांनी कंपनी चांगल्यापद्धतीने काम करीत आहे असे सांगितले. सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम असल्याने पैसे जमा झाले नाहीत असेही सांगितले. नंतर दुसऱ्यांदा बेंगलोरमध्ये गुन्हा दाखल झाल्याने कंपनीचे अकांउंट लॉक झाले आहे असें सांगितले. राहुल पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील खातेदारांचे पैसे घेण्याचे जबाबदारी घेतली. गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळणार नाहीत असेही सांगितले. या प्रकाराला कंटाळून अखेर श्री. जाधव यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. यावरून तेरा संशयित आरोपींच्या विरोधात 25 लाख 53 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर इंगोले तपास करीत आहेत.