Thursday 27 December 2012

पोलीस निरीक्षक सोमवंशींसह कॉन्स्टेबलविरुद्ध खंडणीची तक्रार



चोपडा - शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक शामकांत सोमवंशी व कॉन्स्टेबल विकास कोल्हे यांच्या विरोधात येथील न्यायालयात शिवसेना नगरसेवक सुधाकर महाजन यांच्या फिर्यादीवरुन 20 हजाराची खंडणी मागितल्याची तक्रार फौजदारी खटला नं.151/2012 प्रमाणे कलम 504 (जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ) , 384 (पैसे उकळणे वा खंडणी मागणे) नुसार दाखल करण्यात आला आहे. 
महाजन यांच्या तक्रारीनुसार ते नगरसेवकपदी दोन वेळा निवडले आहेत. त्यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी नाही. 25 नोव्हेंबर रोजी चोपडय़ात दंगल घडली, त्यावेळी महाजन हे शेतात त्यांच्या कुटुंबियांसोबत काम करीत होते. दंगलीत सहभाग नसताना सूडभावनेने त्यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला. महाजन यांनी त्यावेळी अमळनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. अटकपूर्व जामिनची पूर्तता करण्यासाठी महाजन व त्यांचे भाऊ रघुनाथ महाजन हे शहर पोलीस स्टेशनला गेले असता तपास अधिकारी एपीआय दिलीप बुवा यांनी सोमवंशीच्या दालनात महाजन यांना नेले, तेथे कॉन्स्टेबल विकास कोल्हे हेही हजर होते. दिलीप बुवा तिथून निघून गेले. शामकांत सोमवंशी यांनी महाजन यांच्याकडे 20 हजार रुपये खंडणी मागितली व कॉन्स्टेबल विकास कोल्हे यांच्याकडे देण्यास सांगितले. 
महाजन यांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्यांना सोमवंशी व कोल्हे यांनी शिवीगाळ केली व ‘तुङो राजकारण संपवून टाकू, गुन्हे दाखल करुन घेणे हे आमच्या अख्यत्यारित असते. तुला मोठमोठय़ा गुन्ह्यांमध्ये अडकवून टाकू व कायमचा संपवून टाकू’ अशी धमकी दिली व शिवीगाळ केली, ‘ असे अनेक तीनपाट नगरसेवक सोमवंशीने पाहिले आहेत. तू काय चिज आहे.’ अशीही भाषा त्यांनी वापरली. त्यानंतरही विकास कोल्हे यांनी महाजन यांच्याकडे पैशांसाठी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. ‘व्यवस्था करतो’ असे महाजन यांनी सांगितले.
त्यानंतर 15 डिसेंबरला विकास कोल्हे यांनी महाजन यांना जळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखा चॅप्टर प्रोसिडींगसाठी हजर केले असता पुढील जामिनाची पूर्तता करण्यासाठी 20 डिसेंबर 12 ची मुदत देण्यात आली. दरम्यानच्या काळात ऐपतदार दाखला (सॉलव्हन्सी) व उतारे काढण्यात महाजन यांचा वेळ गेला. याबाबतीत पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार पाठविलेली आहे. मात्र कार्यवाही झाली नसल्याचे महाजन म्हणतात. 
चौकशी होऊन आरोपींना जास्तीत जास्त दंड व शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी फिर्यादीत केली आहे.
दरम्यान नगरसेवक महाजन व त्यांचे वकील अॅड.धर्मेद्र सोनार यांच्याकडे गुन्हा दाखल झाल्याची सांक्षाकित प्रत मागितली असता आज खटला दाखल होण्यास उशिर झाल्याने प्रत देऊ शकत नाही, ती 28 रोजी देण्याचे त्यांनी सांगितले. 
या घटनेची चर्चा होत असून शहर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व पोलिसांमध्येही कुजबुज होत आहे.

Monday 17 December 2012

साहित्य समाजाला शहाणपण शिकवते - कोत्तापल्ले

सोलापूर - साहित्य सबंध संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून, त्यातून समाजाला शहाणपण शिकवता येते. स्वत:ला सोलून घेतल्याशिवाय चांगल्या साहित्यकृतींची निर्मिती होत नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी रविवारी केले. भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ समीक्षक निशिकांत ठकार अध्यक्षस्थानी होते.

 ज्येष्ठ अभिनेत्री विजया मेहता यांचे आत्मकथन असलेला ‘झिम्मा’, यशवंतराव गडाख लिखित व्यक्तिचित्रांचे ‘अंतर्वेध’ आणि महेंद्र कदम यांच्या ‘आगळ’ या कादंबरीला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रत्येकी 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘महाराष्ट्राला प्रागतिक राज्य करण्यात कवी, लेखकांनी मोठी भूमिका बजावली. ज्ञानेश्वर, तुकाराम, चक्रधर यांनी गद्यरूपाने कविताच लिहिल्या आहेत; ज्या समाजाला नीटनेटके जीवन कसे जगावे, याचे उद्बोधन करणार्‍या आहेत.
पुस्तकांतून वाचकांशी सुसंवाद व्हावा, समाजातील नव्या जाणिवांची माहिती व्हावी, हा मुख्य हेतू असतो. जागतिकीकरणाच्या नव्या व्यवस्थेत स्वत:ला स्थैर्य देताना जी घुसमट होते, ती सामान्यांना जाणवते. ती महेंद्र कदम यांनी ‘आगळ’मधून व्यक्त केली. असे अनुभवणार्‍यांनी लिहिते व्हावे. त्यात राजकारणी असावेत, उद्योगपती असावेत. तरच मराठी साहित्य समृद्ध होईल, असे वाटते.’

सुसंवादासाठी 'झिम्मा'  
'झिम्मा' नाट्यकलेचा इतिहास नव्हे; तर इतिहासाची काही पाने उलटतात. नव्या पिढीशी सुसंवाद व्हावा, यासाठीच हा लेखनप्रपंच. जीवनातील नाती शोधून संवाद साधण्याची कला साहित्यात आहे. नाती सांगताना अप्रतिम एकांत मिळतो.
- विजया मेहता

कोंडी फोडायची  
घर, कुटुंब विकलांग होत आहेत. नाती कोरडी पडत आहेत. नवी पिढी जुन्या पिढीला मेंटली अनफिट समजत आहे. या स्थितीत शहाणे गोंधळात पडले, मूर्ख त्यांच्या मतांवर ठाम आहेत. ही कोंडी साहित्यिकच फोडू शकतील. 
-यशवंतराव गडाख


माणूसपणा शोधा  
जन्माचे सार्थक काय, याचा शोध घेतला. त्याने ज्या व्यवस्थेत गेलो, तिथे माणूसपण नाकारले गेले. तिथूनच लेखन सुरू झाले. स्वकीयांशी लढून गाव-शहर जोडू पाहणार्‍यांच्या कथा मांडल्या. माणसाच्या वस्तूकरणाची प्रक्रिया मांडली. 
-महेंद्र कदम  

Wednesday 5 December 2012

आंबेडकरी जनतेच्या आनंदावर वृत्तवाहिन्यांचे श्रेयवादाचे विरजण


गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा मुद्दा बुधवारी निकाली निघाला. संसदेच्या दोन्ही सभागृहात जागा देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली. बाके वाजवून सर्व खासदारांनी त्याचे स्वागत केले. मुबंई आणि राज्यातील इतर शहरांमध्ये आंबेडकरी जनतेने पेढे वाटून, फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. मात्र, हा आनंदोत्सव दाखवत असतानाच, काही वृत्तवाहिन्या या आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कांबळे यांची प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे प्रतिक्रिया घेत होते. तेव्हा सहाजिकच आता तुम्हाला काय वाटते हा प्रश्न होता आणि त्याचे स्वाभाविक उत्तर होते, हा आनंदाचा क्षण आहे. आंबेडकरी जनतेचा हा विजय आहे.

आंबेडकरी जनतेच्या आनंदात याचवेळी बेकीचे बीज पेरण्याचे काम काही वृत्तवाहिन्या करताना दिसल्या. या विजयाचे श्रेय कोणाला देणार, हा प्रश्न वारंवार नेत्यांना विचारला जात होता. मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यानंतर पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत इंदू मिल हस्तांतरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. याबद्दलची सूचक माहिती मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी संध्याकाळी दिली. तेव्हापासूनच काही वाहिन्यांनी एकाच वेळी सर्व रिपाई नेत्यांना फोनवर सोबत घेऊन चर्चा सुरु केली. या आनंदाच्या क्षणी चर्चेचा सूर मात्र श्रेय कोणाला देणार असा होता. दिल्लीतून काँग्रेसच्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या. त्यांनाही वरील आशयाचेच प्रश्न विचारले जात होते. हे प्रश्न खोदून खोदून विचारुन वृत्तवाहिन्यांना नेमके काय साधायचे होते ?

बाबासाहेबांचे स्मारक हा काही राजकीय विषय नाही. सुरुवातीला विजय कांबळेंनी सनदशीर मार्गाने ही मागणी काही वर्षांपूर्वी लावून धरली होती. आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतानाही त्यांच्या पक्षाने विधिमंडळात किंवा संसदेत ही मागणी आग्रहाने मांडली, असे चित्र कधी पाहायला मिळाले नाही. माजी खासदार रामदास आठवले यांनीही त्यांच्या खासदारकीच्या काळात इंदू मिलच्या जागेवर स्मारक व्हावे, यासाठी संसदेत एखादी कविता ऐकविल्याचे आठवत नाही. रिपब्लिकन सेनेने गेल्या वर्षी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात इंदू मिलचा ताबा घेत उग्र आंदोलन केले आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्परतेने इंदू मिलबाबात केंद्र सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले हे सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ आहे. त्यासाठी चव्हाण यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या दिल्लीतील संपर्काचा पूरेपूर वापर करुन घेतला आणि मागणी मान्य करुन घेतली.

श्रेयाच्या राजकारणावरून वृत्तवाहिन्या या नेत्यांमधील दुराव्याचा फायदा घेत आठवलेंना विचारतात की, आनंदराज म्हणत आहेत की, हे त्यांचे यश आहे? तेव्हा त्यांचे उत्तर असते की, कोणी काहीही म्हटले तरी हा आंबेडकरी जनतेचा विजय आहे. आम्हीही त्यासाठी आंदोलन केले होते. हा संपूर्ण आंबेडकरी जनतेचा लढा होता आणि तो आम्ही जिंकला आहे.

यात आठवले हे कुठेही आनंदराज किंवा इतर नेत्यांचे श्रेय नाकारत नाही, हे स्पष्ट असतानाही वृत्तवाहिन्या दाखवतात की, हे आमचेच यश आहे असे आठवले म्हणत आहेत, असे का? वृत्तवाहिन्यांना वास्तव मांडायचे आहे, की वादाची ठिणगी टाकायची आहे? आनंदराज यांनीही कुठेही म्हटले नाही की हे मी केले! त्यांनीदेखील प्रत्येक वृत्तवाहिनीला हेच सांगितले की, हा आंबेडकरी जनतेचा विजय आहे. तरीही वृत्तवाहिन्या ओढून ताणून आंबेडकरी चळवळीतील नेत्यांमध्ये श्रेयाचे राजकारण सुरु आहे, हे का बिंबवतात? त्यासाठी अर्ध्या-अर्ध्या तासाचा विशेष कार्यक्रम घेऊन त्यांच्यात का शाब्दिक युद्ध लावून देतात? वृत्तवाहिन्यांनी असे करण्यामागे काय 'राजकारण' आहे,  हे काही समजत नाही. स्मारकाची घोषणा झाल्यानंतर सगळेजण मान्य करीत आहेत की, हा सर्वांच्या आंदोलनाचा आणि आंबेडकरी जनतेचा विजय आहे. अशावेळी वृत्तवाहिन्यांनी श्रेयवादाचे पालुपद लावून धरणे कितपत इष्ट आहे? उगाच भावेनेचे राजकारण चिघळवणे इष्ट आहे का ? नेत्यांना स्क्रिनवर समोरासमोर आणून एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला लावून जनतेच्या आनंदावर विरजण टाकणे बरोबर आहे का?
- उन्मेष खंडाळे