औरंगाबादचे साकेत प्रकाशन ही एक मान्यताप्राप्त प्रकाशन संस्था. मागीलवर्षी महाराष्ट्र शासनातफेर् दिला जाणारा उत्कृष्ठ प्रकाशनासाठीचा ‘श्री.पु.भागवत’ पुरस्कार या प्रकाशनाला प्राप्त झाला. तसेच मुंबई साहित्य संघातर्फे दिला जाणारा ‘वि.पु.भागवत’ पुरस्कारही या संस्थेला यावर्षी प्राप्त झाला. साहजिकच या प्रकाशनाची ग्रंथव्यवहाराबाबत नैतिक जबाबदारी वाढली. यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या. पुण्या मुंबईच्या बाहेर मराठी प्रकाशन व्यवसाय फारसा बहरला नाही. या दृष्टीने विचार करता साकेत प्रकाशनाने औरंगाबादला आपली संस्था स्थापन केली व वृद्धिंगत केली. 1500 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केलेली ही संस्था.
या प्रकाशनाच्यावतीने शिवराज गोर्ले यांची ‘दुरंगी’ या नावाची कादंबरी नुकतीच (डिसेंबर 2011) मध्ये प्रकाशित झाली. ही कादंबरी 1995 मध्ये ‘सामना’ नावाने इंद्रायणी साहित्य (पुणे) या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली होती. मुक्त अर्थव्यवस्थेची पाठराखण करणारी मराठीतील पहिलीच कादंबरी म्हणून तेंव्हा तिचा गौरवही झाला होता.
साहजिकच जेंव्हा या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली तेंव्हा हा सगळा उल्लेख त्यावर असावा अशी अपेक्षा होती. किमान हे पुस्तक पुर्वी कुठल्या प्रकाशनाने आणि कोणत्या नावाने प्रकाशित केले आहे हे नोंदवणे आवश्यक होते. पण तसे काहीच घडले नाही. पुस्तक चक्क पहिल्यांदाच निघते अशा आवेशात प्रकाशकांनी ते प्रकाशित केले आहे.
ज्या प्रकाशनाला मौजेच्या दोघाही भागवत बंधूंच्या नावाचा पुरस्कार प्राप्त झाला, ज्या भागवत बंधूंनी आयुष्यभर प्रकाशन व्यवसायाची नैतिकता जपली त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारणार्या साकेत प्रकाशनाला अशी लबाडी करायची का गरज भासली?
यातली गोम अशी की हे पुस्तक शासनाच्या खरेदीमध्ये, राजा राम मोहन रॉय योजनेच्या खरेदीत, विविध पुरस्कारांसाठी सादर होणार. त्याची खरेदी जर शासनाने इ.स.2011 मधील नवीन पुस्तक म्हणून केली तर या व्यवहाराला काय म्हणायचे? या पुस्तकाला एखादा पुरस्कार प्राप्त झाला तर काय करायचे?या पुस्तकासाठी प्रकाशक म्हणून जी काही मेहनत इंद्रायणी साहित्यच्या श्याम कोपर्डेकरांनी केली असेल ती तर मातीतच गेली. त्याची भरपाई कशी करायची? पु.ल. देशपांडे यांची पुस्तके देशमुख आणि कंपनीने आधी प्रकाशित केली होती. त्यांच्या पुस्तकांच्या पुढच्या आवृत्त्या/ पुनर्मुद्रणे मौजेनं प्रकाशित केली पण आवर्जून त्यावर पहिल्या आवृत्तीचे प्रकाशक म्हणून देशमुखांचे नाव ठेवले. पण शिवराज गोर्ले किंवा साकेत प्रकाशन या दोघांनाही ही नैतिकता पाळाविशी वाटली नाही. या वृत्तीला काय म्हणावे?
साकेतच्या कैक प्रकाशनांवर आवृत्त्यांचे क्रमांकच नसतात. शासकीय खरेदी साठी चाललेली ही लबाडी सामान्य वाचकांच्या लक्षात येत नाही. पण निदान मोठमोठे प्रतिष्ठेचे पुरस्कार देणार्या संस्थांच्या तरी लक्षात यावी. आता 16 तारखेला मुबईमध्ये उत्कृष्ठ प्रकाशक म्हणून ‘वि.पु.भागवत’ पुरस्कार स्वीकारल्यावर साकेत प्रकाशन पुरस्काराला उत्तर काय देणार? नवीन प्रकाशकांपुढे काय आदर्श म्हणून ठेवणार? दुसर्यांच्या संहिता पैशाच्या जोरावर पळवा आणि परस्पर शासनाच्या ग्रंथखरेदीमध्ये घुसडून पैसे कमवा. शिवाय विविध पुरस्कार मिळवून प्रतिष्ठाही मिळवा. त्यासाठी कुठलीही मेहनत करण्याची गरज नाही. लेखकांना किती आवृत्या निघाल्या हे सांगण्याची आवश्यकता नाही.