नांदेड - संत म्हटले की फक्त आत्मा, परमात्मा, देव, धर्म याच गोष्टी येऊन आदळतात. पण अध्यात्मापेक्षा आजच्या काळात त्यांचा सामाजिक विचारच अधिक महत्त्वाचा आहे, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी सोमवारी संध्याकाळी नांदेड येथे केले. ‘रिंगण’ या पहिल्या आषाढी अंकाच्या www.ringan.in या वेबसाईटचे प्रकाशन त्यांच्या हस्ते एका छोटेखानी पण विविध विचारांचा समन्वय झालेल्या कार्यक्रमात पार पडले.
‘रिंगण’ वार्षिकाच्या संत नामदेव विशेषांकाच्या इंटरनेट आवृत्तीचे प्रकाशन नामदेव पुण्यतिथीच्या मुहूर्तावर मराठी-पंजाबी संस्कृतीचे समन्वय केंद्र असणा-या नांदेड येथे आयोजित करण्याचे औचित्य साधण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी, शीख धर्माचे अभ्यासक प्रा. हरमहेंद्र सिंग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद नांदेड शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम यांनी आपले विचार व्यक्त केले.
संतांचे योगदान मोठेच आहे. पण त्याचा विचार करताना साध्या साध्या कष्टक-यांनीही संस्कृतीच्या उत्क्रांतीत आपला वाटा उचलला होता, याचे भान ठेवले पाहिजे, असे हबीब म्हणाले. मानवतेच्या दृष्टिकोनातून संतांचे कार्य महत्त्वाचे आहे. पण त्यांच्या कामाची तुलना किंवा संबंध विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीशी जोडण्याचे काहीच कारण नाही. तसे करण्याऐवजी आज संतांचे आदर्श आपल्या जीवनात कसे आणता येतील, याचा विचार करायला हवा, असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील विपर्यास दूर करण्याचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. तशाच पद्धतीने संतांच्या इतिहासातील विपर्यास दूर करण्याच्या कामाची सुरुवात ‘रिंगण’ने केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संत नामदेवांनी देशभर फिरून पिचलेल्यांना बळ दिले. पण आज त्यांचे नाव घेणारे घराच्याही बाहेर पडण्यात उत्सूक नसतात. भाषा प्रांतांच्या आजच्या भांडणात नामदेवांचे राष्ट्रीय स्वरूपाचे कार्य अधिक महत्त्वाचे ठरते, अशा शब्दांत त्यांनी नामदेवांच्या मोठेपणाची मीमांसा केली. आज नामदेव असते तर त्यांनी जागतिक पातळीवर विचारांच्या प्रसारासाठी इंटरनेटसारख्या माध्यमांचा वापर केला असता. त्यामुळे ‘रिंगण’ इंटरनेटवर येणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
संत नामदेवांनी उत्तर भारतात संतपरंपरेची सुरुवात केली, असे सांगत प्रा. रंगनाथ तिवारी यांनी उत्तर भारतावरचा नामदेवांचा प्रभाव सविस्तर मांडला. ‘रिंगण’मध्ये नामदेवांच्या अनेक पैलूंवर अभ्यासपूर्ण लेख असून कोणताही महत्त्वाचा मुद्दा सुटलेला नाही, असे प्रमाणपत्रच त्यांनी दिले. तर प्रा. डॉ. जगदीश कदम यांनी संशोधनाच्या दृष्टीने ‘रिंगण’च्या अंकाला फार मोल असल्याचे सांगितले. आजही परिवर्तनाच्या चळवळीत नामदेवांनी घालून दिलेला संयमित बंडखोरीचा धडा महत्त्वाचा आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. तर प्राचार्य हरमहेंद्र सिंग यांनी अस्खलित मराठीतील भाषणात गुरू ग्रंथसाहेबामध्ये नामदेवांच्या जीवनातील प्रसंगांचा महिमा कसा वर्णन केला आहे, हे समजावून सांगितले. आज सर्वधर्मसमन्वयाचीच नाही, तर सर्वधर्मस्वीकाराची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी नामदेवांच्या संदर्भात मांडले.
‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांनी वेबसाईट सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. व्यंकटेश चौधरी यांनी निवेदन केले. तर पत्रकार राजीव गिरी यांनी आभार मानले. नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. त्यात माजी आमदार गंगाधरराव पटणे, शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल अलुरकर, दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, दैनिक उद्याचा मराठवाडाचे संपादक राम शेवडीकर, वसंत मय्या, डॉ. प्रा. पृथ्वीराज तौर, प्रा. यशपाल भिंगे इ. उपस्थित होते. या कार्यक्रमाला शीख समाजातील अनेकांनी हजेरी लावली होती.