Thursday, 5 January 2012

तृतीय पंथीयांचे संमेलन

नंदुरबार - उत्सुकता शिगेला पोहचविणार्‍या तृतीय पंथीयांच्या राष्ट्रीय संमेलनाला अक्कलकुवाजवळील सोरापाडा गावात प्रारंभ झाला. देशभरातील साडेतीनशेच्या आसपास तृतीय पंथीयांची संमेलनाला हजेरी लागली असून खिचडीची तुला करून या संमेलनाला पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. तर सोरापाड्याच्या राणीला नायक पद बहाल करण्यात आले.

अक्कलकुवाजवळील सोरापाडा या गावात राहणारी बुलबुल नायक या तृतीय पंथीयाने किन्नर समाजाची अर्थात तृतीय पंथीयांची स्थापना केली. बुलबुल नायकाच्या मृत्यूला दोन वर्ष होत आहेत. त्याच्या मृत्यूनंतर सोरापाडा गावात प्रथमच राष्ट्रीय संमेलन भरविण्यात आले. बुलबुल नायकाच्या जागेवर आज राणीला नायक पद बहाल करण्यात आले. या वेळी राणी नायक या तृतीय पंथीयाला आपले अर्शू अनावर झाले होते.

रेखा नायक बर्‍हाणपूर, जरीना नायक हैदराबाद, शबनम नायक, मीना नायक नागपूर, मुमताज नायक या पंचमंडळाच्या उपस्थितीत आज परंपरेनुसार संमेलनाला प्रारंभ झाला. ढोलक वाजवून गाणे गात तृतीय पंथीयांनी नृत्य केले. जयपूर, मध्य प्रदेश व खान्देशातील तृतीय पंथीय आज संमेलनात दाखल झाले. गुरू शिष्यांची परंपरा या तृतीय पंथीयात दिसली. गुरूंचा आदर राखतांना शिष्य कमालीचे शिस्त दाखवित होते. अत्तराचा सुगंध या संमेलनात दरवळत होता. प्रत्येक तृतीय पंथीयांच्या अंगावर सोन्याचे दागिने दिसत होते. विविध गावातून आलेल्या तृतीय पंथीयांनी रोख रक्कम जाहीर केली. राणी नायकाला नायक पद दिल्यानंतर या नायक पदाची लाज राख, अशी शपथ देण्यात आली. पंच मंडळाने नायकाला आशीर्वाद दिले. खिचडीची तुला करण्यामागे आपल्या पूर्वजांना र्शद्धांजली वाहणे, असा असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

सविताबाईचे सौंदर्य  
सोरापाड्यातील राष्ट्रीय संमेलनात देखणे तृतीय पंथीयांनी हजेरी लावली असून नागपूरहून आलेली राखीबाई, मुंबईहून आलेली सविताबाई या इतक्या देखण्या आहेत की कुठल्याही लावण्यवतीचे सौंदर्य त्यांच्या पुढे फिके पडावे. 



आम्हाला मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचे नाही. आम्हाला टीव्हीवर झळकायचे नाही. बस आम्हाला इतरांसाठी दुआ मागायची असते. आम्ही दुसर्‍यांसाठी शुभकामना करतो. आमचे पोशिंदे सुखाने जगले पाहिजेत म्हणून आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. लग्न समारंभात आम्ही जातो. तिथे नाचतो. कुणाला मुलगा झाला तर आम्ही आशीर्वाद देतो; पण हा आशीर्वाद आम्ही परमेश्वराकडून मागतो. आमच्यापैकी अनेक जण निरक्षर आहेत. फक्त 20 टक्के तृतीय पंथीय साक्षर आहेत. 
रंजीता नायक, तृतीय पंथीय