Wednesday, 5 December 2012

आंबेडकरी जनतेच्या आनंदावर वृत्तवाहिन्यांचे श्रेयवादाचे विरजण


गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा मुद्दा बुधवारी निकाली निघाला. संसदेच्या दोन्ही सभागृहात जागा देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली. बाके वाजवून सर्व खासदारांनी त्याचे स्वागत केले. मुबंई आणि राज्यातील इतर शहरांमध्ये आंबेडकरी जनतेने पेढे वाटून, फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. मात्र, हा आनंदोत्सव दाखवत असतानाच, काही वृत्तवाहिन्या या आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कांबळे यांची प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे प्रतिक्रिया घेत होते. तेव्हा सहाजिकच आता तुम्हाला काय वाटते हा प्रश्न होता आणि त्याचे स्वाभाविक उत्तर होते, हा आनंदाचा क्षण आहे. आंबेडकरी जनतेचा हा विजय आहे.

आंबेडकरी जनतेच्या आनंदात याचवेळी बेकीचे बीज पेरण्याचे काम काही वृत्तवाहिन्या करताना दिसल्या. या विजयाचे श्रेय कोणाला देणार, हा प्रश्न वारंवार नेत्यांना विचारला जात होता. मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यानंतर पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत इंदू मिल हस्तांतरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. याबद्दलची सूचक माहिती मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी संध्याकाळी दिली. तेव्हापासूनच काही वाहिन्यांनी एकाच वेळी सर्व रिपाई नेत्यांना फोनवर सोबत घेऊन चर्चा सुरु केली. या आनंदाच्या क्षणी चर्चेचा सूर मात्र श्रेय कोणाला देणार असा होता. दिल्लीतून काँग्रेसच्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या. त्यांनाही वरील आशयाचेच प्रश्न विचारले जात होते. हे प्रश्न खोदून खोदून विचारुन वृत्तवाहिन्यांना नेमके काय साधायचे होते ?

बाबासाहेबांचे स्मारक हा काही राजकीय विषय नाही. सुरुवातीला विजय कांबळेंनी सनदशीर मार्गाने ही मागणी काही वर्षांपूर्वी लावून धरली होती. आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतानाही त्यांच्या पक्षाने विधिमंडळात किंवा संसदेत ही मागणी आग्रहाने मांडली, असे चित्र कधी पाहायला मिळाले नाही. माजी खासदार रामदास आठवले यांनीही त्यांच्या खासदारकीच्या काळात इंदू मिलच्या जागेवर स्मारक व्हावे, यासाठी संसदेत एखादी कविता ऐकविल्याचे आठवत नाही. रिपब्लिकन सेनेने गेल्या वर्षी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात इंदू मिलचा ताबा घेत उग्र आंदोलन केले आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्परतेने इंदू मिलबाबात केंद्र सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले हे सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ आहे. त्यासाठी चव्हाण यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या दिल्लीतील संपर्काचा पूरेपूर वापर करुन घेतला आणि मागणी मान्य करुन घेतली.

श्रेयाच्या राजकारणावरून वृत्तवाहिन्या या नेत्यांमधील दुराव्याचा फायदा घेत आठवलेंना विचारतात की, आनंदराज म्हणत आहेत की, हे त्यांचे यश आहे? तेव्हा त्यांचे उत्तर असते की, कोणी काहीही म्हटले तरी हा आंबेडकरी जनतेचा विजय आहे. आम्हीही त्यासाठी आंदोलन केले होते. हा संपूर्ण आंबेडकरी जनतेचा लढा होता आणि तो आम्ही जिंकला आहे.

यात आठवले हे कुठेही आनंदराज किंवा इतर नेत्यांचे श्रेय नाकारत नाही, हे स्पष्ट असतानाही वृत्तवाहिन्या दाखवतात की, हे आमचेच यश आहे असे आठवले म्हणत आहेत, असे का? वृत्तवाहिन्यांना वास्तव मांडायचे आहे, की वादाची ठिणगी टाकायची आहे? आनंदराज यांनीही कुठेही म्हटले नाही की हे मी केले! त्यांनीदेखील प्रत्येक वृत्तवाहिनीला हेच सांगितले की, हा आंबेडकरी जनतेचा विजय आहे. तरीही वृत्तवाहिन्या ओढून ताणून आंबेडकरी चळवळीतील नेत्यांमध्ये श्रेयाचे राजकारण सुरु आहे, हे का बिंबवतात? त्यासाठी अर्ध्या-अर्ध्या तासाचा विशेष कार्यक्रम घेऊन त्यांच्यात का शाब्दिक युद्ध लावून देतात? वृत्तवाहिन्यांनी असे करण्यामागे काय 'राजकारण' आहे,  हे काही समजत नाही. स्मारकाची घोषणा झाल्यानंतर सगळेजण मान्य करीत आहेत की, हा सर्वांच्या आंदोलनाचा आणि आंबेडकरी जनतेचा विजय आहे. अशावेळी वृत्तवाहिन्यांनी श्रेयवादाचे पालुपद लावून धरणे कितपत इष्ट आहे? उगाच भावेनेचे राजकारण चिघळवणे इष्ट आहे का ? नेत्यांना स्क्रिनवर समोरासमोर आणून एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला लावून जनतेच्या आनंदावर विरजण टाकणे बरोबर आहे का?
- उन्मेष खंडाळे