Monday, 17 December 2012

साहित्य समाजाला शहाणपण शिकवते - कोत्तापल्ले

सोलापूर - साहित्य सबंध संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून, त्यातून समाजाला शहाणपण शिकवता येते. स्वत:ला सोलून घेतल्याशिवाय चांगल्या साहित्यकृतींची निर्मिती होत नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी रविवारी केले. भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ समीक्षक निशिकांत ठकार अध्यक्षस्थानी होते.

 ज्येष्ठ अभिनेत्री विजया मेहता यांचे आत्मकथन असलेला ‘झिम्मा’, यशवंतराव गडाख लिखित व्यक्तिचित्रांचे ‘अंतर्वेध’ आणि महेंद्र कदम यांच्या ‘आगळ’ या कादंबरीला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रत्येकी 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘महाराष्ट्राला प्रागतिक राज्य करण्यात कवी, लेखकांनी मोठी भूमिका बजावली. ज्ञानेश्वर, तुकाराम, चक्रधर यांनी गद्यरूपाने कविताच लिहिल्या आहेत; ज्या समाजाला नीटनेटके जीवन कसे जगावे, याचे उद्बोधन करणार्‍या आहेत.
पुस्तकांतून वाचकांशी सुसंवाद व्हावा, समाजातील नव्या जाणिवांची माहिती व्हावी, हा मुख्य हेतू असतो. जागतिकीकरणाच्या नव्या व्यवस्थेत स्वत:ला स्थैर्य देताना जी घुसमट होते, ती सामान्यांना जाणवते. ती महेंद्र कदम यांनी ‘आगळ’मधून व्यक्त केली. असे अनुभवणार्‍यांनी लिहिते व्हावे. त्यात राजकारणी असावेत, उद्योगपती असावेत. तरच मराठी साहित्य समृद्ध होईल, असे वाटते.’

सुसंवादासाठी 'झिम्मा'  
'झिम्मा' नाट्यकलेचा इतिहास नव्हे; तर इतिहासाची काही पाने उलटतात. नव्या पिढीशी सुसंवाद व्हावा, यासाठीच हा लेखनप्रपंच. जीवनातील नाती शोधून संवाद साधण्याची कला साहित्यात आहे. नाती सांगताना अप्रतिम एकांत मिळतो.
- विजया मेहता

कोंडी फोडायची  
घर, कुटुंब विकलांग होत आहेत. नाती कोरडी पडत आहेत. नवी पिढी जुन्या पिढीला मेंटली अनफिट समजत आहे. या स्थितीत शहाणे गोंधळात पडले, मूर्ख त्यांच्या मतांवर ठाम आहेत. ही कोंडी साहित्यिकच फोडू शकतील. 
-यशवंतराव गडाख


माणूसपणा शोधा  
जन्माचे सार्थक काय, याचा शोध घेतला. त्याने ज्या व्यवस्थेत गेलो, तिथे माणूसपण नाकारले गेले. तिथूनच लेखन सुरू झाले. स्वकीयांशी लढून गाव-शहर जोडू पाहणार्‍यांच्या कथा मांडल्या. माणसाच्या वस्तूकरणाची प्रक्रिया मांडली. 
-महेंद्र कदम