Sunday, 30 October 2011

सोशल नेटवर्किंग गरज की व्यसन?

इंटरनेट क्षेत्रातील बदलामुळे जगभरातील कोणतीही माहिती एका सेकंदात उपलब्ध होऊ शकते; मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगचा वापर युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. वापरामागे विविध कारणेही आहेत. यामुळे अपडेट राहायला मदत होते. शिवाय, नवनवीन माहिती मिळण्यास मदत होते. नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे सोशल नेटवर्किंगचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही. मात्र इंटरनेटच्या फायद्या-तोट्याचे गणित अनेकांना अद्याप समजलेले नाही. सोशल नेटवर्किंगच्या अतिरेकामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजारही होत असतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वापर हे व्यसनच असून, योग्य वेळी थांबवणे गरजेचे आहे.

सोशल नेटवर्किंग म्हणजे नेमके आहे तरी काय? असा प्रश्‍नही अनेकांसमोर उभा राहतो. इंटरनेटचा वापर हा सोशल नेटवर्किंगसाठी सर्वाधिक वापरला जातोय. सोशल नेटवर्किंगला भारतातल्या इंटरनेट युजरकडून सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच "गुगल' ही सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेली कंपनी प्रथम भारतातल्या युजरचा विचार करते. सोशल नेटवर्किंगसाठी फेसबुक, ट्विटर, एफबी, ऑर्कूट, चॅटिंग असे अनेक पर्याय युजर्सपुढे उपलब्ध आहेत. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, भारतातला 75 टक्के युजर हा 35 वर्षाच्या आतील वयाचा आहे. भारतातील युजर इंटरनेटसाठी आठवड्याला किमान साडेबारा तास वेळ देतात. दिवसातले अनेक तास इंटरनेटवर घालविणाऱ्यांची संख्याही मोठी असून, दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
ट्विटरमुळे अनेक जण सेकंदा-सेकंदाला आपली वैयक्तिक माहिती अपलोड करताना दिसतात. शिवाय यू-ट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ अपलोड करता येत असल्यामुळे दर सेकंदाला ठिकठिकाणचे व्हिडिओ अपलोड होताना दिसतात. जगात कोणतीही घटना घडली तरी काही वेळातच त्याचे व्हिडिओ यू ट्यूबर उपलब्ध होतात. सोशल नेटवर्किंगच्या प्रभावी माध्यमामुळे अनेकजण इंटरनेटच्या सतत संपर्कात राहतात. माहिती तंत्रज्ञानातील बदलामुळे मोबाईलमध्येही अनेक बदल झाले आहेत. सोशल नेटवर्किंगच्या सेवा मोबाईलमध्ये उपलब्ध असल्यामुळे, अनेक जण मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे.

इंटरनेटसारख्या माध्यमामुळे अगदी मोकळेपणाने युजर्सला आपली मते समोरच्या व्यक्तीसमोर मांडता येतात. शिवाय, माहितीची देवाण-घेवाणही मोठ्या प्रमाणात होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती मिळत राहते. इंटरनेट विश्‍व हे माहितीचा खजिना असल्यामुळे प्रत्येक जण नवनवीन माहितीच्या शोधात असतो. सोशल नेटवर्किंगचे हे फायदे आहेत, यात तीळमात्र शंका नाही. परंतु काही प्रमाणात तोटेही आहेत, हेही आपल्याला मान्य करावे लागेल. खरे तर सोशल नेटवर्किंगचा वापर आपण कसा करतो, यावर सर्व काही अवलंबून असते. मध्यंतरी सोशल नेटवर्किंगचा तोटाही अनेक देशांना बसला. त्यानंतर सोशल नेटवर्किंगवर बंदी असावी, की काही प्रमाणात निर्बंध लादावेत, यावर अनेक तज्ज्ञांनी आपली मते मांडली.

सोशल नेटवर्किंगचा वापर युवकांमध्ये एवढा वाढला आहे, की अनेक जण तासन्‌ तास आपला वेळ इंटरनेटवर घालवताना दिसतात. एक तास, एक दिवस जर इंटरनेटची सेवा कोलमडली तर काय होईल? याचा विचार न केलेलाच बरा. अनेक जण फेसबुकवर पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत अपडेट करत असतात. इंटरनेटच्या अतिवापरामुळे घरातील सदस्यांशी बोलणे कमी झाले आहे. म्हणूनच सर्दी, खोकला झाल्याचे सर्वात प्रथम सोशल नेटवर्किंगवरील मित्रांना समजते, त्यानंतर घरात व्यक्तींना माहिती होते. मैदानी खेळही कमी होत चालल्यामुळे शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. इंटरनेटचे स्पीड कमी झाले तरी चिडखोरपणा वाढताना दिसतो. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे इंटरनेट ही काळाची गरज होऊन बसली आहे. ई-मेल तपासणे, जगभरातील माहिती घेत राहणे यासाठी इंटरनेटचा वापर योग्य आहे. परंतु सहा तासांहून अधिक काळ जर इंटरनेट वापरात असाल, तर व्यसनाच्या आहारी गेल्याचे समजावे. यासाठी आपण स्वतः काही निर्बंध लादून घ्यायला हवेत. इंटरनेटमुळे जग जवळ येऊन ठेपले आहे, माहिती मिळत आहे, हे अगदी बरोबर. परंतु इंटरनेट नसल्यामुळे चिडचिडेपणा वाढत असेल, काही सुचत नसेल तर ते मग व्यसनच. त्यामुळे व्यसनाच्या आहारी जायचे की माहितीसाठी इंटरनेटचा वापर करायचा हे प्रत्येकाने ठरविणेच योग्य ठरेल.

सोशल नेटवर्किंग हे खरोखरच प्रभावी माध्यम आहे. परंतु त्याच्या आहारी जाणे हेही एक व्यसनच. इंटरनेटमुळे एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मात्र त्यातील धोक्‍यांपासून प्रत्येकाने सावध राहण्याची आवश्‍यकता आहे.

इंटरनेटचे फायदे -
- जगभरातील नवनवीन घडामोडी समजण्यास मदत.
- आपले मत मांडण्यासाठी मोठे व्यासपीठ.
- सोशल नेटवर्किंगसारखे अनेक पर्याय खुले.
- काही सेकंदातच जगभरातून ई-मेल मिळू शकतात.
- जगभरातील माहिती खजिना उपलब्ध.

इंटरनेटचे तोटे -
- मैदानी खेळामुळे कमी झाल्यामुळे शारीरिक व्याधी.
- मानसिक आजार होण्याची शक्‍यता.
- चिडचिडेपणात वाढ.
- वैयक्तिक माहितीचा इंटरनेट क्षेत्रात गैरवापर होण्याची शक्‍यता.
- इंटरनेटच्या अतिवापरामुळे कुटुंबातील सदस्यांची चर्चा कमी होण्याची शक्‍यता.

संतोष धायबर