Sunday, 2 October 2011

वाहिन्यांवरील एरंडाचे गुऱ्हाळ

नको त्या गोष्टींना अनावश्यक महत्त्व देउन वृत्तवाहिन्या किती सुमार कामगिरी करीत आहेत हे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. आपण देत असलेले वृत्त हे विश्वासार्ह नाही तर करमणूक प्रधान असले पाहिजे असल्या विचाराने प्रेरीत होउन बातम्यांचे सादरीकरण केले जात आहे. त्यामध्ये आपल्या अनावश्यक केलेल्या गोष्टींमुळे काही चांगल्या व्य्नितंच्या अवमुल्यनाचा प्रकार होत आहे याचे भान या वाहिन्यांना राहिलेले नाही. काही व्य्नितंना किती महत्त्व द्यायचे हे या वाहिन्या विचारात घेत नाहीत. मागच्या आठवड्यापासून अशीच गाजत असलेली एक बातमी म्हणजे शोएब अख्तरच्या आत्मचरीत्रावरून अनावश्यक वाद निर्माण केला गेला जात आहे. त्यात म्हणे त्याने सचिन तेंडूलकरवर टीका केली आहे. सचिन आपल्याला घाबरतो असे लिखाण केले आहे त्यामुळे त्या बातमीवर लगेच एरंडाचे गुऱ्हाळ सुरू केले. या बातमीला महत्त्व देण्याइतकी ती मोठी बातमी होती काय? कारण नसताना शोएब अख्तरच्या पुस्तकाची फुकटात प्रसिद्धी मात्र या वृत्तवाहिन्यांनी केली. हा सगळा वृत्तवाहिन्यांच्या भोंगळ कारभार आहे. त्या शोएब अख्तरच्या पुस्तकातील एक पानही न वाचता त्यावर चर्चा करणे हा च्नक वेडेपणा म्हणावा लागेल. कोणीतरी सांगतो की शोएब अख्तरने सचिन तेंडूलकर मला घाबरतो असे त्याच्या पुस्तकात लिहीले आहे की लगेच शोएबचा निषेध सुरू. सचिन कसा महान आहे. तो कसा स्निसर मारतो. त्याने किती धावा काढल्या आहेत हे सांगण्यासाठी वृत्त वाहिन्यांवर मग चढाओढ सुरू झाली. अत्यंत सवंग आणि सुमार कामगिरी म्हणून या प्रकाराकडे पहावे लागेल. आपण इथं बसून फालतू रटाळ चर्चा करून शोएब अख्तरच्या पुस्तकातला मजकूर बदलणार आहे काय? ते पुस्तक प्रकाशित झाले नाही. मार्केटमध्ये आलेही नाही. त्यापुर्वीच हे चर्चाचर्विचरण कशासाठी केले याचे कोणाकडेही उत्तर नाही. पण या चर्चेमुळे सचिनचे अवमूल्यन करण्याचे काम मात्र वाहिन्यांनी केले. शोएब तर दुसऱ्या देशाचा त्यातून पाकीस्तानी माणूस आहे. त्यांच्याकडून भारतातल्या प्रत्येक गोष्टीवर टीका येणेच अपेक्षित असताना आपण इथं बसून शोएबला का महत्त्व देत बसलो हे एकाही वृत्तवाहिनीला समजले नाही. दाखवायला चांगल्या बातम्या नाहीत, शोधक आणि कल्पक बुद्धी नाही कसला विचार नाही त्यामुळेच नको त्या कार्यक्रमांना, नको त्या गोष्टींना ठळकपणे प्रसिद्धी देण्याचे काम केले जाते. झी 24 तास, आयबीएन लोकमत आणि स्टार माझा या वाहिन्या अक्षरश: सचिन आणि शोएब याशिवाय दोन दोन दिवस काहीही दाखवत नव्हत्या. त्यानंतर पुन्हा एकदा शोएब अख्तरच्या भूमिकेचे शाहीद अफ्रिदीने समर्थन केले म्हणून त्याच्या टिकेचे सत्र दिवसभर चालवले. शोएब आला की सचिनचे पाय लटपटायचे हे वृत्त दिवसभर दाखवून तथाकथीत तज्ज्ञांची त्यावर मते घेउन सचिन कसा महान आहे हे पटवून देण्याचा आटापिटा वाहिन्यांनी केला. काही गरज नव्हती या गोष्टीची. शेंदाड शिपाई किंवा भेदरट माणसं अशा गोष्टी नेहमीच करतात. एखादं पाप्याचं पितर असतं ते शाळेतून आडदांड मुलाचा मार खाउन येतं. आणि ज्या कोणाला माहित नाही त्यांना ते पाप्याचं पितर सांगतं की मी त्या आडदांड मुलाला मारलं. याला फुशारकी मारणे असे म्हणतात. तोच प्रकार शाहीद अफ्रिदी आणि शोएब अख्तर यांनी केलेला आहे. अख्तर काय फ्नत भारताविरोधातच सामने खेळला काय? जगातल्या सर्व देशांबरोबर त्याने सामने खेळले आहेत. पण सचिन मला घाबरायचा असे तो म्हणतो याचा अर्थच सचिन सर्वश्रेष्ठ आहे हे त्याने मान्य केले आहे. त्यामुळे या चर्चा आणि बातम्यांना इतकी प्रसिद्धी देण्याची काहीच गरज नव्हती. आज महाराष्ट्रात असंख्य समस्या आहेत. महागाई आहे, भ्रष्टाचार आहे, अनागोंदी आहे. सरकारने शिक्षणाचे वाटोळे केले आहे. शिक्षणात भ्रष्टाचार झाला आहे. या विषयांकडे एकाही वाहिनीचे लक्ष नाही. सरकारला बदलायला लावायची ताकद वृत्त वाहिन्यांमध्ये असताना ते काम न करता फालतू गोष्टींवर चर्चा करण्यात या वाहिन्या गुंतल्याने सखेद आश्चर्य वाटल्या वाचून रहात नाही. तोच प्रकार दोन दिवसांपुर्वी पुन्हा एकदा केला गेला. लता मंगेशकर यांना अमिताभ बच्चन यांच्या हस्ते हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी लता मंगेशकर यांनी अमिताभ बच्चन यांना भारतरत्न द्यावे अशी अपेक्षा व्य्नत केली. अपेक्षा व्य्नत केली म्हणजे काही सरकार लगेच त्याची घोषणा करणार नव्हते. पण झी 24 तासवरून त्यावर रोखठोक कार्यक्रम घेतला. त्यात अगदी विश्वास मेहेंदळेंपासून ज्येष्ठ पत्रकारांना समाविष्ट करून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू केले. काही आवश्यकता होती काय याची? त्या कार्यक्रमात मग अमिताभ आणि लता मंगेशकर यांच्यावर टीकेचा सूर आला. त्यांनी भरपूर पैसे कमावले आहेत त्यामुळे लता मंगेशकर आणि अमिताभ यांना भारतरत्न देउ नये असे एका विद्वानाने व्य्नत केले. म्हणजे लता मंगेशकर यांना आधिच तो पुरस्कार दिला गेला आहे याचेही भान नव्हते. एका महाशयांनी महात्मा गांधींना हा पुरस्कार का दिला नाही म्हणून मुद्दा उपस्थित केला तर एकाने मेधा पाटकर यांना हा पुरस्कार द्यावा अशी मागणी केली. कशाचाही कशाशीही संबंध नसलेली ही चर्चा घडवली गेली. काही वैचारीक चर्चा करायला या वाहिनीकडे मुद्दे नाहीत काय? शिक्षणातील अनागोंदी प्रकाराबाबत का नाही चर्चा घडवली? या असल्या फालतू चर्चांना रोखठोक काय उधारही पहायला कोणाला आवडत नाहीत. ज्या कोणी मेधा पाटकर यांचे नाव सुचवले त्या मुद्याचा आधार घेउन का नाही अशी एखादी चर्चा वाहिनीवर घडवली गेली की मेधा पाटकर यांचे आंदोलन किती खरे किती पोकळ? पंचवीस वर्ष त्या नर्मदेच्या खोऱ्यात ठाण मांडून बसल्या आहेत. त्याने काय साध्य झाले? मेधा पाटकर यांचे नाव या आंदोलनामुळे गिनीज बुकमध्ये नोंदवा अशी मागणी करायला पाहिजे. पण त्यांचे आंदोलन नेमके काय आहे याबाबत चर्चा का नाही कधी घडवली? आपल्याकडे लोकांच्या अनेक कृतींचे आकलन अनेकांना होत नसते. त्याचे आकलन होण्यासाठी अशा चर्चा घडवणे आवश्यक असते. अण्णांच्या आंदोलनामुळे मागचा बाजार चांगला गेला. पण त्यानंतर काही विषय मिळेनात म्हटल्यावर सचिन, लता, अमिताभ यांना कुठेतरी टच करण्याचा प्रयत्न केला गेला. जितेंद्र आव्हाड नामक राष्ट्रवादीच्या आक्रमक आमदारांनी लगेच शोएब अख्तरचा कोणताही कार्यक्रम होउ देणार नाही. त्याला विरोध केला जाईल. अशी ब्रेकींग न्यूज या वाहिनीने सोडली. ज्या मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड निवडून आले आहेत त्या भागातून पाकीस्तानी, बांग्लादेशी घुसखोर हाकलून लावू अशी प्रतिज्ञा का नाही आव्हाडांनी केली? आपली धाव ज्या कुंपणापर्यंत आहे तिथे आपण काही करू शकत नाही आणि कुंपणाबाहेर भुंकायला कशासाठी जायचे? या बातमीला महत्त्व देण्याची गरज होती काय? वृत्त वाहिन्यांच्या अशा सुमार आणि अनावश्यक कामगिरीमुळे चित्रपटांप्रमाणेच एखादे सेन्सॉर बोर्ड नेमावे असे वाटते.

प्रफुल्ल फडके
संपादक कर्नाळा
पनवेल