Monday, 26 September 2011

'दर्डा'वणारेच हवालदिल

अलीकडच्या काही लेखांमधून मी वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, त्यांचे संपादक व अनेक ज्येष्ठ पत्रकार यांच्यावर झोड उठवली होती. त्यांचा खरेखोटेपणा, त्यांचेच शब्द, लेख, उतारे किंवा बोलणे यातून चव्हाटय़ावर आणला. त्यापैकी कुणालाही त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावेसे वाटलेले नाही; म्हणूनच त्यांनी या आक्षेप-आरोपांचा स्वीकार केला, असे मानणे भाग आहे आणि त्यापैकी कुणी तसे धाडस करू शकत नाही याची मला पूर्ण खात्री आहे. कारण माझी ही लढाई आजची नाही. बारा-पंधरा वर्षे भ्रष्ट, बदमाश प्रवृत्तीच्याविरुद्ध एकाकी लढत देत आलो आहे. ती लढाई मुंबईपुरती आणि माझ्या अल्प साधनांनी लढवली जात असल्याने फारशा लोकांपर्यंत-वाचकांपर्यंत पोहचत नव्हती. 'पुण्यनगरी'ने ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात नेऊन पोहचवली.

यातले बहुतांश संपादक पत्रकार व्यक्तीश: मला ओळखतात व चांगल्या परिचयाचे सुद्धा आहेत. त्यांचे माझे कोणतेही व्यक्तिगत भांडण नाही. म्हणूनच मी त्यापैकी कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्याबद्दल अक्षरही लिहिले नाही. केवळ त्यांच्या जाहीर भूमिका व जाहीर व्यवहारांपुरता विषय मर्यादित ठेवला आहे. यातली बहुतांश मंडळी मात्र तो शिष्टाचार त्यांच्या पत्रकारी व्यवहारात पाळत नाहीत. कुणाच्याही व्यक्तिगत जीवनात डोकावणे, खाजगी आयुष्यातल्या गोष्टी चव्हाटय़ावर आणताना त्यांनी विधिनिषेध बाळगलेला नाही. तरीही त्यांच्याशी ही मुद्यांची लढाई लढताना मी तो विधिनिषेध पाळला आहे. पण त्यांच्याकडे वैचारिक वा मुद्देसूद उत्तरेही नाहीत हे जगासमोर स्पष्ट झाले.

ताजे उदाहरण द्यायचे तर गेल्या गुरुवारी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या मंत्रालयातील स्वीय सहायकाला पोलिसांनी रंगेहात पकडले. एवढी खळबळजनक बातमी अन्य कुठल्या मंर्त्याबद्दल असती तर तो 'आजचा सवाल' झाला असता. 'दर्डा'वून निखिल वागळे यांनी संबंधित मंर्त्याला खुलासे मागितले असते. पण या बातमीचे नामोनिशाण 'कायबीइन लोकमत' वाहिनीवर नव्हते. यालाच भ्रष्टाचार म्हणतात. तुमच्या आमच्या सामान्यांच्या मराठी भाषेत 'चोराच्या उलटय़ा बोंबा' म्हणतात. एका वर्षापूर्वी सांगली-मिरजचा माजी महापौर बागवान फरारी असताना जयंत पाटील नामक मंर्त्याच्या बंगल्यावर गेला असल्याचे वृत्त सांगताना व जयंतरावांना त्याचा जाब विचारताना निखिलचा आवेश आठवतो का? अर्थात पोलिसांनी त्याला वॉन्टेड वा फरारी घोषित करण्याआधी तो बंगल्यावर गेला होता ही गोष्ट अलाहिदा. म्हणजे आरोप चुकीचा असून देखील निखिल जयवंतरावांना आरोपी लपवला म्हणून दमदाटी करत होता. आता राजेंद्र दर्डाचा स्वीय सहायक मंत्रालयातच पकडला गेलेला असताना 'आजचा सवाल' विचारणारे हवालदिल होऊन भलतेच चराट वळत बसले होते.

भ्रष्टाचार हाच असतो. जे खोटे आहे, गैर आहे, बनावट आहे ते पूर्ण ठाऊक असतानाही दडपशाही करण्याला भ्रष्टाचार म्हणतात ना? मग ती खोटी बातमी, खोटा आरोप असो की कारण नसताना कुणाची अडवणूक करून उकळलेली रक्कम असो. भ्रष्टाचाराची सुरुवात भ्रष्ट बुद्धीतून होत असते. चांगले-वाईट, खरेखोटे, भलेबुरे करण्याच्या कामी माणसाला विवेक मदत करत असतो आणि विवेक हा बुद्धीच्या पायावर उभा असतो. जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा विवेक डळमळू लागतो.

आपली निर्भिडता, परखडपणा जगासमोर दाखवायला निखिल वागळे, कुमार केतकर यांच्यासारखे संपादक महेश भट, अमरापूरकर यांच्यासारखे कलावंत किंवा अन्य साहित्यिक, पत्रकार कुणाला धारेवर धरतात तेव्हा तो निकष त्यांनी प्रत्येकाच्या बाबतीत तेवढय़ाच कठोरपणे लावायला हवा. नरेंद्र मोदी भेटला किंवा आपल्याकडे पिस्तुल असते तर आपण त्याला ठार मारले असते, असे विजय तेंडुलकर यांनी म्हटल्यावर या सर्व शहाण्यांची दातखिळी बसली होती. त्यांना तसे म्हणायचे नव्हते, असली सारवासारव सुरू झाली होती. हा भ्रष्ट बुद्धीचा नमुना आहे. जयवंतरावांना आर.आर. आबा पाटलांना संपादकगिरीचा हिसका दाखवीत (आपण मंर्त्यांना घाबरत नाही असा) बोलणारा निखिल वागळे दर्डा नावाचा मंत्री असला मग फुसका बार होतो. हा सर्वात भयंकर भ्रष्टाचार असतो.

समाजात प्रतिष्ठित, मान्यवर, नावाजलेले लोक जेव्हा असे सोयीचे शिष्टाचार दाखवू लागतात तेव्हा लोकही त्यांचे अनुकरण करू लागतात. जशी माणसाची बुद्धी असते तसा समाजातला बुद्धिवादी-प्रतिष्ठित घटक ही समाजाची बुद्धी असते. ती भ्रष्ट झाली, विवेकशून्य वागू लागली मग आपोआप अवघा समाज राजरोस भ्रष्टाचार करू लागतो. आपल्या सोयीचा भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार तर आपल्या गैरसोयीचा शिष्टाचार तोच भ्रष्टाचार, अशी व्यवहारातील भाषा व व्याख्या बदलून जाते. गेल्या दोन दशकात पत्रकार, विचारवंतांनी मोठय़ा प्रमाणात या भ्रष्टाचाराची लागण केली; त्याचेच भीषण परिणाम आज आपण अनुभवत आहोत.

याचा एक पुरावा पुरेसा ठरावा. आजकाल प्रत्येक मोठी कंपनी, संस्था वा राजकीय पक्ष यांनी आपल्या यंत्रणेत मीडिया मॅनेजर हे पद निर्माण केले आहे. प्रसिद्धी हवी असेल तर त्या संस्था-संघटनांना याच मॅनेजर्सकडून त्याची पूर्वतयारी करून घ्यावी लागते. तमाम संबंधित पत्रकारांना आमंत्रण देण्यापासून त्यांची प्रवास, खाण्या-पिण्याची सोय करावी लागते. त्यातली देवाण-घेवाण बाजूला ठेवू. हे मीडिया मॅनेजर्स काय करतात? नावावरून लक्षात येते की ते आपल्या संस्था-यजमानासाठी मीडिया 'मॅनेज' करतात. याचा अर्थ मीडिया 'मॅनेज' केला जातो. मॅनेज करता येतो. ज्याला मॅनेज केले जाते तो स्वतंत्र, परखड, सडेतोड, निर्भिड कसा असू शकेल? अविष्कार स्वातंर्त्याचे झेंडे रात्रंदिवस खांद्यावर घेऊन फिरणार्‍यांनी याचे उत्तर द्यायला नको का? पत्रकारिता व माध्यमे स्वयंभू, निरपेक्ष असतील तर हे मीडिया मॅनेजर्स कशाला असतात?

तेवढेच नाही. पीआर कंपन्याही निघाल्या आहेत. त्या कंपन्या माध्यमे, वृत्तपत्रे यात बातम्या प्रक्षेपित वा छापून आणत असतात. बातम्या सुटसुटीत लिहून वृत्तपत्रांना पाठवत असतात. त्यामुळेच अनेकदा एकच मजकूर शीर्षक बदलून अनेक वृत्तपत्रांत छापून येतो. हे सर्व मॅनेज होते आणि मॅनेज झालेले आजचे सवाल विचारून विनाकारण आवेशपूर्ण अभिनय करीत असतात. तिथून भ्रष्टाचार सुरू होतो.

भारतीय समाजाची आज जी बौद्धिक घसरगुंडी झालेली आहे त्यातच भ्रष्टाचाराचा उगम आहे. माहिती देणार्‍या अधिकाराबद्दल खूप बोलले जाते, पण माहिती 'लपवण्याचा' विशेषाधिकार राबवला जातो त्याचे काय? राजेंद्र दर्डाच्या स्वीय सहायकाच्या धरपकडीवर लोकमत वृत्तपत्र वा वाहिनी मौन धारण करतात, हा शिष्टाचार आहे की भ्रष्टाचार? आपले पाप लपवणारा प्रत्येकजण सदाचारी असतो. भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणायची जबाबदारी घेतलेलेच असा निर्ढावलेपणाने बौद्धिक वैचारिक भ्रष्टाचार करणार असतील तर सर्वसामान्य माणसाचे आदर्शच भ्रष्ट होऊन जातात ना? आज सर्वत्र बोकाळलेला जो भ्रष्टाचार दिसतो त्याचे मूळ म्हणूनच बौद्धिक भ्रष्टाचारात रुजलेले आहे. 

भाऊ तोरसेकर
मो. 9702134624