Thursday, 3 November 2011

केजरीवाल यांनी पंतप्रधानांना पाठवला चेक

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आयआरएस सेवेचा राजीनामा दिल्याप्रकरणी भरपाई म्हणून त्यांनी आज सरकारला सव्वा नऊ लाख रूपये परत केले आहेत. पंतप्रधान मनमोहनसिंह यांना पत्र लिहून चेकच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांनी ही रक्कम परत केली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्याकडे कोणतीही सेव्हिंग सध्या नाहीय. त्यांना या रकमेवरून अनेकदा कोंडीत पकडण्याचे प्रयत्नही झाले आहेत. केजरीवाल यांच्या मदतीला त्यांचे आयआयटीचे मित्र धावून आले आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी दावा केला आहे की, आपल्या सहा मित्रांकडून कर्ज घेऊन आपण ही रक्कम परत केली आहे. केजरीवाल यांचे आयआयटीचे वर्गमित्र राजीव सराफ यांच्याकडून १ लाख १५ हजार, सुब्रतो सहाय यांच्याकडून ३ लाख ५० हजार, हरिष हांडे यांच्याकडून ३ लाख रूपये, अतुल बल यांच्याकडून ६२ हजार रूपये, विकास गंगल यांच्याकडून ५० हजार रूपये आणि टाटा स्टीलमध्ये काम करणारे त्यांचे मित्र पी.श्रीनिवास यांच्याकडून केजरीवाल यांनी ५० हजारांचं कर्ज घेतलंय.

पंतप्रधानांना पाठवला चेक
अरविंद केजरीवाल यांनी ९ लाख २७ हजार ७८७ रूपयांचा चेक आणि त्यासोबत पंतप्रधान मनमोहन सिंह यांना पत्र लिहलंय, त्यात आपल्याला कर्ज म्हणून पैसे देणारे मॅगसेस पुरस्कार विजेते हरिष हांडे यांच्यासह आपल्या सहा मित्रांना त्रास देऊ नये अशी विनंती केजरीवाल यांनी पंतप्रधानांना केली आहे.

आपण विरोध म्हणून हे करित आहोत, याचा अर्थ असा नाही की मी माझी चूक मान्य केलीय, असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय.

केजरीवाल यांनी आयआरएस तीन वर्ष पूर्ण केलं नाही, त्यांनी संपूर्ण पगार घेऊन अभ्यासासाठी सुट्टी घेऊन बॉन्डच्या नियमांचं उल्लंघन केलं, असा आरोप केजरीवाल यांच्यावर करण्यात येत होता. पण केजरीवाल यांच्या मते, त्यांनी बिनपगारी सुट्टी घेतलीय आणि नियमानुसार सेवा केली आहे.

पंतप्रधानांना केजरीवाल यांचं पत्र
केजरीवाल यांनी पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात म्हटलंय की, मी पत्रासह नऊ लाख २७ हजार ७८७ रूपयांचा चेक पाठवतोय, पण याचा अर्थ हा नाही की मी चूक मान्य केली आहे. जेव्हा मला माहित नाही की मी चूक काय केली आहे, तर ती चूक मान्य करण्याचा प्रश्नच नसल्याचं केजरीवाल यांनी पत्रात लिहलंय.

मी ही रक्कम विरोध म्हणून परत करतोय, मी तुम्हाला आवाहन करतो की, गृहमंत्र्यांना माझा राजीनामा मंजूर करण्याची सूचना द्या, माझा राजीनामा मंजूर झाल्यानंतर ही रक्कम परत घेण्यासाठी मला न्यायालयात अपील करण्याचा अधिकार मिळेल.

केजरीवाल यांनी दावा केला आहे की, आपल्याकडे कोणतीही सेव्हिंग नाहीय, त्यांनी आपल्या सहा मित्रांकडून कर्ज घेतलं आहे. अनेकांनी आपल्याला पैसे देण्यासाठी हात पुढे केले पण मी पैसे नाही घेतले, पैसे घेतले तर मी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा दुरूपयोग करतोय, असा अर्थ काढला गेला असता.

केजरीवाल आपल्या सरकारी सेवेच्या दरम्यान १ नोव्हेंबर २००० रोजी दोन वर्ष पूर्ण केल्यानंतर अभ्यासाठी सुटीवर होते. यासाठी त्यांनी एक बॉन्डही लिहून दिला आहे, यावर त्यांचे हस्ताक्षर आहेत. बॉन्डनुसार जर ते तीन वर्षांच्या आत सुटीच्या काळात राजीनामा देतात, किंवा सेवेत परत येत नाहीत तर त्यांना पूर्ण पगार परत करावा लागेल.

केजरीवाल १ नोव्हेंबर २००२ ला पुन्हा कार्यालयात परतले पण त्यांनी पुन्हा १८ महिन्यांची बिनपगारी सुट्टी घेतली.सरकारच्या मते १८ महिन्यानंतर सुटी घेणे बॉन्डच्या नियमांचं उल्लंघन आहे. पण अरविंद केजरीवाल यांनी हा आरोप फेटाळून लावलाय. मी बॉन्डमधील कोणताही नियम तोडलेला नाही आणि अभ्यास सुटीनंतर मी पुन्हा सेवेत परतल्यानंतर तीन वर्षांनी मी नोकरीचा राजीनामा दिला.