Sunday, 20 November 2011

राज मास्तरांनी घेतली छडी; परीक्षेशिवाय तिकीट नाही

मुंबई -  महापालिकेच्या निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या "मनसे'च्या कार्यकर्त्यांना शनिवारी नवा मंत्र मिळाला. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी "नवनिर्माणा'ची छडी उगारली, तेव्हा आपल्याला आता पारंपरिक राजकारण सोडण्याशिवाय पर्याय नाही, अशीच भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात उमटली असेल. त्यामुळे शाळा-कॉलेजांत दिलेल्या परिक्षेसारखीच परीक्षा घेण्याच्या राज यांच्या निर्णयाला साऱ्यांनीच "मनसे' दाद दिली.

आगामी महापालिका निवडणुकीबाबत राज यांनी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ""महापालिका निवडणुकीसाठी तिकीट "फिक्‍स' असल्याच्या गैरसमजात कोणीही राहू नये. इतरांना "गिमिक' अथवा "स्टंट' वाटू दे; मनसेचे तिकीट मिळविण्यासाठी अगदी राज ठाकरेंनाही लेखी परीक्षा द्यावीच लागेल,'' असा धडा त्यांनी दिला. लिहिता-वाचता न येणाऱ्यांनी घरीच बसावे, असा छडीचा मार द्यायलाही ते विसरले नाहीत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचे गणित थोडेसे चुकले; पण मुंबई महापालिका निवडणुकीत ती कसर भरून काढू, असा इशाराच त्यांनी शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांना दिला. सभागृहात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे निवडणुकीचे तिकीट देण्याची प्रक्रिया राज यांनी स्पष्ट केली. उमेदवारी मिळण्यासाठी सर्व इच्छुकांना लेखी परीक्षा द्यावीच लागेल, असे त्यांनी ठासून सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठीही अशीच प्रक्रिया होईल, असे ते म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 4 डिसेंबरला सकाळी 11 ते साडेबारा या वेळेत इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल.

शहरातील इच्छुकांसाठी माटुंगा येथील डी. जी. रुपारेल महाविद्यालय आणि उपनगरातील इच्छुकांसाठी पार्ले येथील साठे महाविद्यालय ही परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षेत कॉपी अथवा इतर गैरप्रकार करणाऱ्यांनी घरी बसण्याची तयारी ठेवावी, असा सज्जड दमही राज यांनी दिला आहे.

""महापालिकेत प्रवेश करणारा मनसेचा लोकप्रतिनिधी अभ्यासू असला तरच नागरिकांचे प्रश्‍न सुटतील. त्यासाठी तयार केलेली संदर्भ पुस्तिका 1000 रुपयांत उपलब्ध करून दिली जाणार आहे. याच पुस्तिकेवर लेखी परीक्षा आधारित असेल; त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम मुलाखत मी स्वत: घेणार आहे'', असे राज यांनी जाहीर केले. त्या वेळी टाळ्यांचा कडकडाटात करून कार्यकर्त्यांनी या घोषणेचे स्वागत केले. एका प्रभागातील इच्छुकांनी एकाच गाडीतून परीक्षेच्या ठिकाणी जावे. ती गाडी त्यांनी लगेच परत पाठवून परीक्षा केंद्राच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळावी, असा सल्लाही राज यांनी दिला.

अशी आहे आचारसंहिता
1.परीक्षा केंद्रात दोन तास आधी प्रवेश
2.परीक्षा सुरू झाल्यावर प्रवेश नाही.
3.कॉपी करणारा तत्काळ बाद.
4.परीक्षा प्रवेशपत्राशिवाय प्रवेश नाही.
5.एकाही कार्यकर्त्याला सोबत आणायचे नाही.
6.पेपर फोडण्याचा अजिबात प्रयत्न नको.
7.वशिलेबाजीचा प्रयत्न केल्यास "हद्दपार'.
8."डमी'चा प्रयत्न केल्यास "नापास'.
9.एका उमेदवाराला एकाच प्रभागातून अर्ज.
10.जातपडताळणी दाखला अनिवार्य.
11.परीक्षेच्या दीड तासाच्या काळात वर्गाबाहेर जाण्यास बंदी