मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यात पटाईत असले, तरी त्यांचा पहाडी आवाज मात्र त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनाही काहीसा खटकतो. त्यामुळे त्यांच्या जवळ जाऊन कैफियत मांडताना प्रत्येकांना त्यांच्याबाबतची आदरयुक्त दराऱ्याची भीती अधिक असते; मात्र आज (गुरुवार) त्यांच्या जनता दरबारात शिक्षकाची नोकरी मिळविताना फसवणूक झालेल्या बेरोजगार युवकाने दर्दभरी कहाणी ऐकवली. या युवकाची कैफियत ऐकून अजित पवार यांनी थेट संबंधित शिक्षण संस्थेच्या सचिवाला "दादागिरी'ची प्रचीती दाखविली.
पश्चिम महाराष्ट्रातील राजेश नावाचा युवक कोणाच्याही ओळखीशिवाय गुरुवारी राष्ट्रवादी भवनमधील दर गुरुवारी होणाऱ्या अजित पवार यांच्या जनता दरबारात हजर झाला होता. उच्च शिक्षण घेतलेल्या शेतकरी कुटुंबातील राजेशला एका खासगी संस्थेत शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष संबंधित शिक्षण संस्थेच्या सचिवांनी दिले. या बदल्यात राजेशकडून सहा लाख रुपये घेण्यात आले. जमिनीचा तुकडा विकून आणि काही कर्ज घेऊन राजेशने सहा लाख रुपयांची व्यवस्था केली. शिक्षकाची नोकरी मिळणार, या आशेने त्याचे लग्नही जमविण्यात आले; पण वर्ष लोटले तरीही संस्थाचालकाने नोकरी दिली नाही. अखेर नोकरी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राजेशने सचिवाकडून सहा लाख रुपये परत मागितले; मात्र एकदा दिलेले पैसे परत करणार नाही. तुला नोकरी कधीतरी देऊ, असे सांगत संस्थाचालकाने राजेशला रेंगाळत ठेवले.
ही सर्व कहाणी राजेशने अजित पवार यांच्या कानावर घातली. त्याच्याकडे पैसे घेतलेल्या संस्थेच्या सचिवांचा दूरध्वनी क्रमांक होता. अजित पवार यांनी लगेचच संबंधित सचिवाशी दूरध्वनीवर संपर्क साधला. "मी अजित पवार बोलतोय. तुम्ही राजेश नावाच्या युवकाकडून नोकरी देण्यासाठी सहा लाख रुपये घेतलेत का, असा करड्या आवाजात त्यांनी सवाल केला'. त्यामुळे पलीकडून पाचावर धारण बसलेल्या संस्थेच्या सचिवाने तत..पप.. करत उत्तरे दिली. पैसे घेतल्याची खात्री पटल्यावर, आज मी राजेशला तुमच्याकडे पाठवत आहे. त्याला त्याचे पैसे परत करा नाही तर तुमच्या मागे उद्यापासून पोलिसांना लावेल, असा सज्जड दम अजित पवार यांनी दिला.
संस्थेच्या सचिवाला सुनावल्यानंतर अजित पवार यांनी राजेशला जाण्यास सांगितले; शिवाय त्या सचिवाने पैसे परत दिले नाहीत, तर परत मला सांग. मी बघतो काय करायचे ते, असेही सांगितले. त्यानंतर राजेश समाधानाने घरी गेला.