Friday 2 December 2011

...सरकारी अधिकाऱ्यांना नाचवलं सापांनी!

लखनौ - एखाद्या सरकारी कार्यालयात कामासाठी वारंवार खेटे घालूनही दाद घेतली जात नसेल तर काय करावं...? आणि समजा अनेक मिनतवाऱ्यांनंतर यदाकदाचित कुणी दाद घेतली, तरी काम करून देण्याच्या बदल्यात लाच मागितली तर...तर काय करावं? तर संबंधित कार्यालयात चक्क साप सोडावेत...! नाही, नाही, हा काही काम करवून घेण्याचा पर्याय मुळीचच होऊ शकत नाही...आणि तसं कुणी कुणाला सुचवूही नये...पण एके ठिकाणी खरंच असं घडलं आहे खरं!

हे जिथं घडलं ते राज्य आहे - उत्तर प्रदेश. गाव - हरय्या आणि ही "करामत' करणाऱ्या व्यक्तीचं नाव - हक्कुला. हक्कुलानं "हरय्या' या गावातील सरकारी अधिकाऱ्यांना अशा रीतीनं हरवलं!

हक्कुला आहे सर्पमित्र आणि त्याला उभारायचं आहे सर्पोद्यान. परिसरातील सरकारी कार्यालयांत घुसणारे साप पकडण्याचं काम तो गेली अनेक वर्ष करतो. पकडलेल्या सापांसाठी एक सर्पोद्यान असावं, अशी त्याची इच्छा आणि त्यासाठी छोटासा भूखंड मिळावा, ही मागणी. तहसीलदार कार्यालयाकडं ही मागणी करकरून तो थकून गेला...पण सरकारी अधिकाऱ्यांनी-कर्मचाऱ्यांनी काही त्याची दाद घेतली नाही. इकडं हक्कुलाचा राग मनातल्या मनात साठत गेला आणि तब्बल तीन डझन विषारी सापांच्या रूपानं बाहेर पडला! हक्कुलानं केलं काय, तर आजवर पकडून ठेवलेले हे सगळे साप त्यानं तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडून दिले. या प्रकारानंतर कार्यालयातील अधिकाऱ्यांना-कर्मचाऱ्यांना पळता भुई अक्षरशः थोडी झाली! जीव वाचवण्यासाठी काहींनी तर खिडक्‍यांमधून उड्याही घेतल्या. अन्य कामांसाठी कार्यालयात आलेल्या सामान्य नागरिकांनीही कार्यालयाबाहेर धूम ठोकत या "सर्पसंकटा'पासून स्वतःचा बचाव केला.

थोडक्‍यात, हक्कुलानं सगळं कार्यालय काही काळ असं पुंगीशिवायच नाचवलं...!

सर्पोद्यानासाठी भूखंडाची मागणी हक्कुला तीनेक वर्षांपासून करत होता...."पकडलेले साप ठेवायला जागा हवी आहे; तेव्हा छोटासा का होईना भूखंड आपल्याला मिळावा,' असं त्याचं म्हणणं. मात्र, "असा भूखंड देण्याची तरतूदच नाही,' असं ठेवणीतलं सरकारी उत्तर देऊन दर वेळी त्याची बोळवण केली जात असे. शेवटी हक्कुलानं तब्बल 36 साप अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडून दिले...आणि नंतर हलकल्लोळ माजला...

हक्कुलाच्या मागणीविषयी तहसीलदार सुभाषमणी त्रिपाठी यांचं म्हणणं असं - "हक्कुलाविषयी आम्हाला सहानुभूती आहे; पण सर्पमित्राला भूखंड देण्याची तरतूदच नसल्यानं आमचाही नाइलाज होता. आता घडल्या प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हक्कुलाला हंगामी स्वरूपाचा भूखंड देण्याचे प्रयत्न सुरू आहेत; पण हक्कुलानं जे काही केलं ते चुकीचं आहे, हेही आपण विसरता कामा नये.'' हक्कुलाच्या विरोधात स्थानिक पोलिसांकडं तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या सगळ्या प्रकारानंतर हक्कुलाला त्याची बाजू मांडायची आहेच. तो म्हणतो, "तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भूखंड देण्याची तयारी दाखविली होती; पण ते लाच मागत असल्यानं रागाच्या भरात मी हे कृत्यं केलं.''

आता, या लाचरूपी सापाचं करायचं तरी काय, याचं उत्तर मात्र कुणाकडंच नाही!