Tuesday 6 September 2011

`खात्या-पित्या' कुरणातले बागडणे थांबले ....सुप्रिया बागवडेंच्या पापाचा घडा अखेर फुटला

संदीप कुलकर्णी / सातारा
सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या खंडाळय़ाला तहसीलदार सुप्रिया बागवडे 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळय़ात अडकल्या. यावेळी राजकीय वरदहस्तही त्यांना वाचवू शकला नाही. त्यांच्या मुजोरीचा आणि पापाचा घडा फुटला असून महसुलाच्या `खात्या-पित्या' कुरणातले सुप्रियाताईंचे बागडणे
सध्यातरी थांबले आहे.
महसूल खाते म्हणजे सर्वात खाते-पिते खाते. या खात्यात वर्णी लागावी यासाठी अनेकजण देव पाण्यात घालतात तर काहीजण वाटेल तेवढा पैसा ओतून पोस्टींगसाठी धडपडतात. या विभागात काम करणाऱया अगदी कोतवाल आणि तलाठय़ापासून ते तहसीलदारापर्यंत अनेकांची चांदीच असते. एकीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात रान उठवले आहे. सारा देश आदोंलनात झोकून देत आहेत आणि दुसरीकडे अशा सरकारी `खात्या-पित्या' कुरणात अनेक मदमस्त वळू निवांतपणे चरत आहेत. `सापडला तो चोर नाही तर संताहून थोर' या उक्तीप्रमाणे दिसत नसले तरी अनेक महाभाग सुप्रिया बागवडे यांच्या पकडल्या जाण्याने थोडे सावध झाल आहेत. यावर काही दिवस जातील. केस स्टँड होईल, कोणाला न्याय मिळल कोणावर अन्याय होईल. पण सिस्टिम बदलेल की नाही हे मात्र कोणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही. तहसीलदार म्हणजे तालुक्याचा राजा. न्यायदंडाधिकारी असल्याने आपण देऊ तोच `न्याय' हे पक्के मनात बसल्यामुळे आणि पितृकृपेने मोठा राजकीय वरदहस्त असल्यामुळे सुप्रिया बागवडेंची मुजोरी दिवसेंदिवस वाढत गेली. शिक्षकाच्या पोटी जन्म घेऊनही मूल्य, संस्कार विसरून त्या पैशाच्या हव्यासापोटी वाहवत गेल्या. विटा असो, कोरेगाव असो की जावली जेथे जाईल तेथे मॅडम वादग्रस्त ठरत गेल्या. जिल्हय़ात काम करणारे अनेक तहसीलदार आजपर्यंत वादग्रस्त ठरले मात्र त्यांची वादग्रसता चारभिंतीच्या आतच राहिली. किंवा त्या तालुक्यापुरती मर्यादीत राहिली मात्र, वरदहस्ताच्या पाठिंब्यावर व त्यांच्या फाजील आत्मविश्वासामुळे बागवडे यांची वादग्रस्ता चव्हाटय़ावर आली. ती इतकी की मॅडमच्या विरोधात लोकांना आंदोलने करावी लागली. मोर्चे काढावे लागले. स्त्री म्हणजे झाशीच्या राणीचे रूप. ज्या झाशीच्या राणीने इतिहास घडवला त्या इतिहासाचा अभ्यास करून `झाशीची राणी' होऊन तालुक्याचा कारभार सांभाळण्याचे सोडून बागवडेंना पैसे कमावण्याचे डोहाळे लागले. आपल्या मुलीला क्लास वन अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली म्हणून `त्या' शिक्षक पित्याचा ऊर भरून आला असेल पण त्यांच्या मुलीने संधीचे सोने नव्हे तर माती केली.
वेळ आली की नियती प्रत्येकाला योग्य शिक्षा देतेच. आणि नियतीने जर बागवडे यांना योग्य शिक्षा दिली तर कदाचित सावळज येथील द्राक्ष बागेत त्या द्राक्षं गोळा करताना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको, अशी चर्चाही त्यांच्या सहकाऱयांमध्ये आहे.

ता. क. - शेतीचे क्षेत्र  बिगर शेती करण्यासाठी खंडाळ्याच्या तहसीलदार सुप्रिया बागवडे यांना २० हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले होते. त्या नंतर त्यांना न्यायालयात हजार केले असता अधिक चौकशी साठी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. चौकशी दरम्यान त्यांच्याकडे आत्ता पर्यंत पावणे दोन कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजार केले असता. आज प्रभारी जिल्हा सरकारी वकील सौ.सरोज एस जाधव यांनी मागणी केल्याप्रमाणे  जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. अवचट यांनी लाच प्रकरणी तहसीलदार सुप्रिया बागवडे यांना चौदा दिवसाची न्यायलयीन कोठडी दि २१ सप्टेम्बर पर्यंत सुनावली आहे.