Sunday 11 September 2011

बोरुबहाद्दरांनी तोडले अकलेचे तारे ...

अकलेची ठेकेदारी जणू आमच्याकडेच असल्यासारखे मुंबई- पुण्यातील बोरुबहाद्दर विद्वान वागत आलीय. तीन हजार लोकसंख्येच्या छोट्याशा गावातील अण्णा हजारे नावाचा छटाक माणूस देशपातळीवर चमकू शकतो हेच या तथाकथीत बोरुबहाद्दर विद्वानांना खटकले. अण्णांच्या रुपातील मराठी माणसानं दिल्लीचं तख्त हलवलं. आंदोलनाच्या यशाचे श्रेय अण्णा आणि त्यांच्या टीमने मिडियाला दिलं असताना या आंदोलनाबाबत साशंकतेचे वातावरण तयार करण्याचा नतद्रष्टपणा काही मराठी भाषिक पत्रकारांनी केला. अण्णांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे लोकशाही, संसदेला आव्हान दिेल्याची चुकीची चर्चा सोयीस्करपणे पसरविण्यात आली. स्वातंत्र्यानंतर संपूर्ण देशामध्ये जाणिवा निर्माण करणारे आंदोलन जयप्रकाश यांच्यानंतर अण्णांनी केलं असताना महाराष्ट्रातील हे नतद्रष्ट बोरुबहाद्दर सरकारी तळी उचलण्याचं काम सोयीस्कपणं करीत आली. अवास्तव, अनावश्यक बातम्यांमुळे लोकांच्या नजरेतून उतरलेला ‘हिंदी मिडीया’ अण्णांच्या जनाआंदोलनास ताकद देऊन गेला. दुसरीकडे दूरचित्रवाहिन्यांवरील काही ‘मराठी चॅनल्स’ अण्णांच्या आंदोलनात विघ्न आणण्याचं पाप करीत राहिली. सर्व न्यूज चॅनल्सवर अण्णांचा जयजयकार. विरोधी पक्षही जनभावनेची दिशा लक्षात घेऊन आपली वाटचाल ठरवू लागला असताना अण्णा विरोधी भूमिका घेणार्‍या या बोरुबहाद्दरांचे कारस्थान यशस्वी होऊन त्यांचे नतद्रष्ट विचार लोकांच्या गळी उतरण्याची सुतराम शक्यता नाही. चाटूगिरी करणार्‍या काही बोरुबहाद्दरांकडून या आंदोलनाला उगाचच अण्णा विरुद्ध संसद असा रंग देण्याचा धुर्त प्रयत्न सुरु आहे. सामान्य माणूस भोळा असला, तरी तो मूर्ख नाही. लोकांमध्ये आत्ता कुठे आपल्या लोकशाही हक्कांबद्दल जाणिव निर्माण होऊ लागली आहे. ही जाणिवच भ्रष्ट नेत्यांच्या नजरेत खुपत असताना तथाकथीत बोरुबहाद्दरांनाही त्याचीच लागण झाली की काय अशी शंका व्यक्त होते. खरं तर नागरी आणि ग्रामीण भागात दरी वाढविण्याचे काम मुंबई-पुण्यातील काही बोरुबहाद्दर अक्कलवंत प्रामाणिकपणे करीत आलेत. अण्णांच्या आंदोलन काळात आणि आंदोलनानंतर या बोरुबहाद्दरांनी अकलेचे तारे तोडले. लोकमान्य लोकशक्ती म्हणवून घेणारा लोकसत्ता काय अन् महाराष्ट्र टाईम्स काय?
वाचा दैनिक देशदूत रविवार (दि. ११ सप्टेंबर) शब्दगंध पुरवणी
www.deshdoot.com