Monday, 5 September 2011

गाजराची पुंगी : नाशिक सिटी

चला बाप्पा पावला !
गणेशोत्सवाचे प्रारंभीचे दिवस असल्याने सायंकाळनंतर कुटुबांसहित देखावे पाहण्यासाठी शनिवारपर्यंत फार गर्दी झालेली नव्हती. येत्या काही दिवसांमध्ये होणार्‍या गर्दीचा विचार करून स्वत:ला हुशार समजणार्‍या एका कुटुंबप्रमुखाने शनिवारीच कुटुंबासहित देखावे दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. त्याने हा निर्णय जाहीर केल्यावर पत्नीने ‘अहो अजून सगळे देखावे लागलेले नसतील, आपण दोन-तीन दिवसांनी जाऊ या’, असा सल्ला दिला; मात्र स्वत:च्या हुशारीचा गर्व असलेल्या त्या कुटुंबप्रमुखाने त्याकडे दुर्लक्ष करून तयार होण्याचे आदेश दिले. मुंबई नाक्यापासून देखावे पाहण्यास प्रारंभ केला. पण गर्दी नसल्याने तसेच अद्याप खेळणी विकणारे आले नसल्याने बच्चेमंडळीला देखावे दर्शनाचा आनंद मिळत नव्हता. तिथून पुढे आले तर टॅक्सी स्टॅण्डवरील कठपुतलीचा खेळ अद्यापही सुरूच नव्हता, तर त्यापुढील संदीप हॉटेलसमोर लायटिंग पूर्ण झालेले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सार्‍यांचीच हिरमोड होण्याची वेळ आली; पण आपला निर्णय कसा योग्य आहे, ते दाखविण्यासाठी कुटुंबप्रमुखाने चला पंचवटीतला सगळ्यात सुंदर देखावा दाखवतो. त्यासाठी कुटुंबप्रमुखाने एकीकडे गाडी चालवत मखमलाबादनाका येथील देखाव्याची भरपूर स्तुती केली. त्या जागेवर पोहोचल्यावर त्याला कार्यकर्त्याने सांगितले की, हा देखावा अद्याप अपूर्णच असल्याने रविवारनंतरच तो बघण्यासाठी खुला होईल. कुटुंबप्रमुखाला आपली चूक उमगली; मात्र चूक मान्य केली तर आपली नाचक्की होईल, अशी स्थिती निर्माण झाली. पावसाचे आगमन झाले. बाप्पाच पावला, असे मनाशीच म्हणत त्याने निर्णय फिरवला. चला पावसात पोरं भिजली तर आजारी पडतील. दोन-तीन दिवसांनी येऊ असे म्हणून त्याने दुचाकी घराकडे वळविली.

कैदी नको; पण गांजा आवर
गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या कैद्याला भोजन आदी सुविधा नियमानुसार दिल्या जातात. मोठमोठय़ा तुरुंगांमध्ये कैद्यांना पंचतारांकित सुविधा गुपचूपपणे दिल्या जात असल्याची अनेक उदाहरणे असली, तरी तालुका आणि ग्रामीण भागातील तुरुंगात रिमांडमध्ये असलेल्या गुन्हेगारांनाही सुविधा दिल्या जात असल्याची उदाहरणेही कमी नाहीत. सिन्नर तालुक्यातल्या वावी पोलिस ठाणे भाड्याच्या जागेत असल्याने तेथील तुरुंगास तुरुंग म्हणावे की नाही हाही प्रo्न आहे. गेल्या आठवड्यात या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चास खोर्‍यात एका साधूस मुलाच्या अपहरणाच्या गुन्ह्याखाली अटक केली. रिमांडमध्ये चौकशीसाठी ठेवले असताना या साधूने भोजनाकडे सरळ दुर्लक्ष केले अन् मागणी केली ती गांजाची. मला काहीच नको फक्त गांजा आणून द्या, असा धोशाच त्याने लावला.

पोलिसांनी त्याला हरप्रकारे धाक दाखविला, समजावून सांगितले; पण महाशय अजिबात ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे वैतागलेल्या पोलिसांना त्याची कोठडीची मुदत कधी एकदाची संपते असे होऊन गेले आणि असला कैदी नको अन् त्याच्या गांजा पुरविण्याच्या मागणीचे संकटही नको असे त्यांना होऊन गेले. गांजाच्या या शाब्दिक नशेत त्याच्या चौकशीतून काय निष्पण्ण झाले हे मात्र समजू शकले नाही.

सभात्यागाचा फंडा
जिल्हा परिषदेचे कारभारी म्हणजे लई भारी ! ते कधी काय करतील याचा नेमच नाही. लोकशाहीने दिलेली आयुधे अधिकार्‍यांवर डागताना केवळ ‘अर्थ’अस्त्रच कारभार्‍यांना काबूत करू शकते. असो. एक कारभारी जरा खुट्ट झाले की, सभात्यागाचे अस्त्र घेऊन तयारच असतो. प्रशासन नीट काम करीत नाही. सहकारी मदत करीत नाही. माझे कोणी ऐकत नाही असे सांगत कारभारी भरसभेतून सभात्याग करीत असतो. प्रारंभीस सभात्यागाचे प्रकरण सहकारी कारभार्‍यांनी गांभीर्याने घेतले. जिल्हा परिषदेच्या सभागृहाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी त्यांनी संबंधिताची मनधरणीही केली. मात्र पदाधिकारी काही ऐकायला तयार होईना. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलनाचे विविध प्रकार असताना पदाधिकारी का ऐकत नाही हे कोडे सर्वांनाच होते. शुक्रवारच्या सभेत पुन्हा हाच प्रयोग झाल्यामुळे सभा संपल्यानंतर यामागचे कारण काय याविषयी तर्कवितर्क सुरू होते. सदस्यांची चर्चा सुरू असतानाच एक ठेकेदार आला व त्याने सदर कारभारी एका जागेवर जास्तीतजास्त दोनच तास बसू शकतो असा गौप्यस्फोट केला. संबंधित कारभार्‍याच्या सभात्यागाचे ‘मूळ’ एका ‘व्याधीत’ दडले असल्यामुळे सभात्यागाशिवाय ते तरी काय करणार, असा सवाल केला.

नाहीतर आम्हीच वाजवू की बारा..
गाण्यामुळे एका रात्रीत स्टार झालेली ‘अमृताहूनी गोड’ दिसणारी तारका नुकतीच एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाशकात येऊन गेली. त्यावेळी पत्रकारपरिषदेचेही आयोजन करण्यात आले होते. योगायोगाने पत्रकारपरिषदेची वेळदेखील दुपारी बाराचीच ठरली. अगदी बाराच्या ठोक्याला तिची एण्ट्री होईल आणि तिच्याच गाण्याच्या ओळी अनुभवायला मिळतील, अशी आशा पत्रकारांना होती. मात्र बारा वाजून गेले, सव्वाबारा, साडेबारा, एक वाजायला आला तरी ती येईना. पत्रकारांचा धीर सुटला. निघून जाऊ म्हणत एकेक जण उभा राहू लागला. आयोजकांनी पत्रकारांना थांबण्याची विनंती केली, तेव्हा त्यातील एक पत्रकार म्हणाला, ‘पाच मिनिटात बोलवा नाहीतर आम्हीच वाजवू की बारा’. त्याने असे म्हणताच उपस्थितामध्ये हंशा उसळला