Saturday, 10 September 2011

'दिव्य मराठी'च्या जळगाव आवृत्तीचे शानदार लोकार्पण

जळगाव - औरंगाबाद, नाशिक वाचकांशी दृढ नातं प्रस्थापित केल्यानंतर दैनिक 'दिव्य मराठी'च्या जळगाव आवृत्तीचा लोकार्पण सोहळा शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत आणि असंख्य जळगावकरांच्या साक्षीने झाला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. औरंगाबाद, नाशिकनंतर भास्कर समूहाची देशातील ही ६४ वी आवृत्ती आहे.

राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, खासदार हरिभाऊ जावळे, खासदार ईश्वरलाल जैन, उद्योगपती आणि पद्मश्री भवंरलाल जैन, पद्मश्री आणि कविवर्य ना. धों. महानोर, दैनिक भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल, दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर, स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शेतक-यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी -
सुनील तटकरे (राज्य जलसंपदा मंत्री)

स्वातंत्र्य काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात वृत्तपत्रांनी मोलाची भूमिका बजावली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेने लोकशाहीचे अन्य तीन आधारस्तंभ डगमगू नये, याकडे लक्ष दिले. 'दिव्य मराठी'च्या माध्यमातून शेतक-यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी. राजकारणातील भूमिकाही वृत्तपत्राने जनतेसमोर स्पष्टपणे मांडावी. जळगावबरोबर आता कोकणात आणि त्यातही रायगडमध्ये 'दिव्य मराठी' लवकरात लवकर सुरू करावा.

वृत्तपत्रांमध्ये मोकळी स्पर्धा हवीच - एकनाथ खडसे (विधानसभा विरोधी पक्षनेते)

जळगावमधील वाचकांना सातत्याने नवं काहीतरी हवं आहे आणि ते 'दिव्य मराठी' नक्की देईल. निर्भीडपणे पत्रकारिता करताना समाजातील सगळ्या समूहांना बरोबर घेतले पाहिजे. शेतक-यांना यामध्ये विशेष महत्त्व दिले पाहिजे. वाचकांच्या विश्वासाहर्तेला कोणत्याही स्थितीत तडा जाऊ देऊ नये. वृत्तपत्रांमध्ये मोकळी स्पर्धा निश्चितपणे असायला हवी.

जळगावमधील रखडलेले प्रकल्प ४-५ वर्षांत मार्गी लावू - गुलाबराव देवकर(जळगावचे पालकमंत्री व परिवहन राज्यमंत्री)

'दिव्य मराठी'मुळे आशेचा किरण जळगावकरांना मिळाला आहे. या वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय दिला जाईल. येत्या ४-५ वर्षांत जळगावमधील  रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नक्की प्रयत्न करू. अतिवृष्टीने खान्देशातील कपाशीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये  शेतकऱयांना मदत देण्यामध्ये राज्य सरकार नक्की लक्ष घालेल.

'दिव्य मराठी'नेच जळगावकरांच्या दिवसाची सुरुवात व्हावी - हरिभाऊ जावळे (लोकसभा खासदार)

'दिव्य मराठी'च्या माध्यमातून शेतकऱयांना मार्गदर्शन केले गेले पाहिजे. दिल्लीमध्ये अधिवेशन काळात मुक्काम असताना आमच्या निवासस्थानी पहाटे सर्वांत पहिले 'दैनिक भास्कर' हेच वृत्तपत्र येते. त्याप्रमाणे जळगावातही सूर्याच्या पहिल्या किरणासोबत 'दिव्य मराठी' यावा आणि जळगावकरांच्या दिवसाची सुरुवात व्हावी. जळगाव शहरासोबत जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. वृत्तपत्रातून नात्यागोत्याची विचारधारा व्यक्त होऊ देऊ नये.

नवं स्वीकारणं हा जळगावकरांचा छंद - ईश्वरलाल जैन(जैन उद्योगसमुहाचे अध्यक्ष)

नवं स्वीकारणं हा जळगावकरांचा छंद आहे. जळगावात अनेक वृत्तपत्र असली तरी जळगावकरांच्या वाचनाची भूक अजून शमलेली नाही. वाचकांच्या आवडी-निवडी, त्यांना काय हवं आहे, ते जाणून 'दिव्य मराठी'ने दररोज दर्जेदार अंक प्रसिद्ध करावा.

... त्यामुळे जळगावचा विकास रखडला - पद्मश्री भवरलाल जैन (उद्योगपती)

जैन उद्योग समूहाचे राज्य सरकारकडून ५१२ कोटी रुपयांचे येणे आहे. त्याचा भुर्दंड सामान्य शेतकऱयांना बसतो आहे. तै पैसे न आल्यामुळे ठिंबक सिंचनसाठी लागणाऱया साहित्याचे दर नाईलाजाने वाढवावे लागले. वृत्तपत्राने शेतकऱयांचे प्रश्न, त्यांच्या समस्या ऐरणीवर आणल्या पाहिजे. कोरडवाहू शेतीचे तंत्र शेतकऱयांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. त्यासाठी वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱया पत्रकारांना शेतीचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे. शेतीविषयक स्वतंत्र सदर 'दिव्य मराठी'ने सुरू करावे. गेल्या अनेक वर्षांत केंद्र किंवा राज्य सरकारचा एकही प्रकल्प जळगाव जिल्ह्यात आला नाही. त्यामुळे जळगावचा विकास रखडला आहे.

बातमीसोबत वाचक संस्कृती, साहित्य, परंपरा यांचाही भुकेला - पद्मश्री ना.धों. महानोर (ज्येष्ठ कवी)

बातमीसोबत वाचक संस्कृती, साहित्य, परंपरा याविषयावरील वाचनासाठी भुकेलाआहे. वृत्तपत्र आणि इतर पुरवण्यांमधून याबद्दल लिखाण झाले पाहिजे. देशातील शेतकऱयांचे प्रश्न कमी झालेत. मात्र, ते संपलेले नाहीत, याचा पाठपुरावा वृत्तपत्रांनी केला पाहिजे. कारण शासनाला केवळ वृत्तपत्राचीच भाषा कळते. जळगाव जिल्ह्यात धरणांच्या जागांचे भूमिपूजन झाले. परंतु, गेल्या कित्येक वर्षांत एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. खान्देशाला सातपुडा आणि अजिंठा या डोंगरमाथ्यामधून वाहणाऱया नद्यांचा समृद्ध परिसर लाभला आहे. परंतु, त्यानंतरही या प्रदेशाचा विकास झालेला नाही. येथील विमानतळाचा प्रकल्पही १९५५ पासून रखडलेलाच आहे. त्याचप्रमाणे जळगाव-सोलापूर  रेल्वेमार्ग ३० वर्षांनंतरही पूर्ण झालेला नाही.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमार केतकर यांनी दैनिक 'दिव्य मराठी' सुरू करण्यामागील भूमिका मांडली. भास्कर समूहाचा हिमाचल प्रदेश, नवी दिल्ली, जम्मू, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये विस्तार आहे. मे महिन्यात 'दिव्य मराठीह्'च्या महाराष्ट्रातील पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन औरंगाबाद येथे मोठय़ा दिमाखात पार पडले. त्यानंतर नाशिक आणि आता जळगाव आवृत्तीचे प्रकाशन झाले. रविवारपासून (११ सप्टेंबर) जळगावमधील घराघरांत दैनिक 'दिव्य मराठी'चा अंक दररोज पोचणार आहे.