तर अशाच एका मंचाच्या बहिणबाईंची ही कथा. सिद्धेश्र्वरनगरीत एक दैनिक राज्य करीत होते. (‘एक राजा राज्य करीत होता’च्या धर्तीवर ही कल्पना कशी वाटते?) या राज्यात प्रजाजन कमी पगारात भरपूर काम करीत होते. राज्यात सख्यांसाठी विशेष मंच होता. (सख्याहरींसाठीही असाच एक मंच असावा, अशी मागणी अनेकांनी केली होती पण हे प्रकरण आपल्याला आवरणार नाही, हे लक्षात घेऊन राजाने त्याला मनाईहुकुम बजावल्याचे कळते.) या सख्यांच्या मंचाचा गल्ला सांभाळणार्या बहिणबाईकडे अधूनमधून सख्यांना एकत्र करण्याचेही काम असते म्हणे. तर या बहिणबाईंनी आपल्या सर्व सख्यांचा समस्त तपशील आपल्या संगणकात बंदिस्त करुन ठेवला. हा तपशील आपल्याकडे बंदिस्त स्वरुपात असल्याचा त्यांचा समज एकदा खोटा ठरला आणि या राज्याच्या जाहिरातमंत्र्यांनी आपल्या संगणकावरून तो पळविला असल्याचे त्यांच्या म्हणे लक्षात आले.