Thursday 17 November 2011

सामाजिक लोकशाही रुजविण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची - भि.म.कौसल

भंडारा,- प्रसार माध्यमांची कामगिरी ही स्वातंत्र्य पूर्व काळापासून तर आजच्या आधुनिक काळापर्यंत चोखपणे सुरु आहे. पूर्वीच्या काळी व स्वातंत्र्यानंतर राजकीय जागृतीकरीता प्रसार माध्यम महत्वाची भूमिका सांभाळत होते. आज सामाजिक लोकशाही रुजविण्यात प्रसार माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. असे विचार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर-अमरावती विभागाचे संचालक भि.म.कौसल यांनी व्यक्त केले.
आज (ता.16) पत्रकार भवन येथे जिल्हा माहिती कार्यालय आणि भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्तवतीने राष्ट्रीय पत्रकार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री.कौसल बोलत होते. अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यकांत जाधव होते. प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ झाडीबोली साहित्यीक डॉ.हरिश्चंद्र बोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जे.एम.पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम व माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकारिता सार्वजनिक जबाबदारीचे माध्यम यावर परिसंवाद आयोजित करण्यात आला.
अध्यक्षस्थानावरुन जाधव म्हणाले, पत्रकारिता हे सार्वजनिक जबाबदारीचे माध्यम कसे ठरेल यादृष्टीने पत्रकारांनी विचारमंथन केले पाहिजे. समाजाला प्रबोधन करणारे लेखन पत्रकारांनी करावे, असे ते म्हणाले. 
डॉ.बोरकर म्हणाले, पत्रकारांनी सांस्कृतिक घडामोडीचे प्रतिबिंब वृत्तपत्रामधून उमटवावे. लुप्त होत असलेल्या लोककलांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. संस्कृतिचे जतन कसे करता येईल याकडेही प्रसार माध्यमानी लक्ष द्यावे. 
प्राचार्य डॉ.ढोमणे म्हणाले, आधुनिक काळातील पत्रकारिता व शैक्षणिक क्षेत्रातील पत्रकारिता ही सार्वजनिक जबाबदारीचे माध्यम कसे करता येईल याची अनेक उदाहरणे देवून पत्रकारितेची उपयोगीता उपस्थितांना पटवून दिली.
डॉ.माले म्हणाले, पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोन अधिक ठेवून नकारात्मक बाजू तपासावी, जेणे करुन पत्रकारांची भूमिका ही पारदर्शक बनेल. आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकार सार्वजनिक जबाबदारी स्विकारत असतांना स्वत:च्या आरोग्याकडे अधिक दुर्लक्ष करीत असल्यामुळे स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. 
पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी पत्रकार दिवसाचे महत्व सांगून वाढत्या महागाईमुळे वृत्तपत्र काढतांना संपादक व मालकांना कठीण ठरत असले तरी एक सार्वजनिक जबाबदारी म्हणून वृत्तपत्रे कार्य करीत असल्याचे सांगीतले. 
यावेळी जेष्ठ पत्रकार वामनराव तुरीले, गोपू पिंपळापूरे यांनीही विचार व्यक्त केले. प्रारंभी दिवंगत पत्रकार रमेश चेटूले व कांचन देशपांडे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. 
पत्रकारांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबीराचे फित कापून उद्घाटन संचालक भि.म.कौसल यांनी केले. यावेळी मान्यवर व पत्रकार उपस्थित होते. नेत्र चिकित्सक शेंडे व ईसीजी तंत्रज्ञ संदिप अवसर यांनी सहकार्य केले. 
कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार नंदकुमार राही, अशोक चचडा, हिवराज उके, ललितसिंह बाच्छिल, काशिनाथ ढोमणे, मिलींद हळवे, इंद्रपाल कटकवार, देवानंद नंदेश्वर, प्रमोद नागदेवे, प्रा.नरेश आंबिलकर, चंद्रकांत श्रीकोंडवार, संजिव जयस्वाल, तथागत मेश्राम, सुरेश शेन्डे, प्रफुल्ल घरडे,राजेश उरकुडे, रवि भोंगाने, सुनिल चौरसिया, सुरेश कोटगले, परमेश्वर शेन्डे, राजु आगलावे, नरेंद्र बोंद्रे, विलास केजरकर, देवाजी गजभिये, यशवंत थोटे, दिपक रोहणकर, विरेंद्र गजभिये, पृथ्वीराज बन्सोड, श्री.चव्हाण, छायाचित्रकार सुरेश फुलसुंगे, जिल्हा माहिती कार्यालयाचे मानीक कन्हाके, बसंत मडामे, घनशाम खडसे, गणेशदास तलमले, शंकर शेन्डे, घनशाम सपाटे, रेखा निनावे, प्रशांत केवट यांचेसह अनेकांची उपस्थिती होती. संचालन प्रा.बबन मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार डि.एफ.कोचे यांनी मानले