Friday 18 November 2011

बारबालांनी घातला नाशिकचे व्यापारी मुंदडा यांना गंडा

मुंबई -  नाशिकच्या एका व्यापार्‍याला मैत्रीच्या जाळ्यात अडकवून दोन बारबाला बहिणींनी त्याला तब्बल 55 लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी उमेश मुंदडा (47) यांनी फिर्याद नोंदवल्यानंतर दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी निशा ऊर्फ वंदना बाबुलाल राज (29) आणि तिची बहीण वर्षा राज (27) यांना अटक केली आहे.

मुंदडा यांचा नाशिकमध्ये घाऊक धान्य आणि स्टील विक्रीचा व्यवसाय आहे. मुंबईत कामानिमित्ताने त्यांचे नेहमीच येणे-जाणे असते. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित सुर्वे म्हणाले की, नऊ वर्षांपासून ग्रँट रोड येथील मिनर्व्हा जंक्शन येथील जंक्शन्स बारमध्ये ते येत असत. या दोघीही तिथेच काम करतात. 2004 पासून मुंदडा यांची या दोन बहिणींशी ओळख आहे. मैत्रीच्या नावाखाली निशा व वर्षा यांनी त्यांच्याकडून आतापर्यंत 40 लाखांची रोकड उकळली आहे. तसेच नातेवाइकाच्या लग्नाला हजर राहण्यासाठी या दोघींनी मुंदडा यांच्याकडून साडेपाच लाख रुपयांचे दागिने आणि मीरा रोड येथे फ्लॅट खरेदीसाठी 10 लाख 65 हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. या पैशातून वर्षाने मीरा रोड येथील गीता हाइट्स इमारतीत 1015 चौरस फुटांचा फ्लॅट खरेदी केला. मे 2011 मध्ये मुंदडा यांनी आपल्या पैशाची मागणी केल्यानंतर पैसे परत करण्याऐवजी आणखी 15 लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्या धमकावणीला कंटाळलेल्या मुंदडा यांनी धीर एकवटत अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या दोघींविरोधात विश्वासघात, फसवणूक, हत्येचा प्रयत्न आदी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वर्षा आणि निशाला मदत करणारा त्यांचा मेहुणा मनीष सिंग व त्याची बहीण बिंदिया सिंग फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.