Sunday 13 November 2011

लग्नबाह्य संबंधांसाठी "सोशल नेटवर्किंग'

पॅरिस - पॅरिसच्या रस्त्यांवर सध्या एका वेगळ्याच प्रकारच्या "सोशल नेटवर्किंग'चा प्रकार पाहायला मिळतो आहे. लग्न होऊनही बाहेरख्यालीपणा करण्यास इच्छुक व्यक्तींना सदस्य करून घेणाऱ्या एका "सोशल नेटवर्किंग' ुसंकेतस्थळाची जाहिरात करणारे फलक सध्या येथील मेट्रो रेल्वे स्थानकांवर दिसत आहेत. आतापर्यंत पाच लाख फ्रेंच नागरिकांनी या संकेतस्थळाचे सदस्यत्व पत्करले आहे. शिवाय स्पेन व इटली या अन्य युरोपीय देशांनीही या संकेतस्थळाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केले आहेत.

जे लोक विवाहबाह्य संबंध ठेवण्यास इच्छुक आहेत त्या व्यक्ती आपली इच्छा या संकेतस्थळाच्या माध्यमातून पूर्ण करू शकतात, असे या संकेतस्थळाच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. हे संकेतस्थळ चालवितात अमेरिकेत राहणारे दोन भाऊ आणि त्यांच्या कार्यालयीन साहाय्यक असणाऱ्या वीस महिला! फ्रान्स, इटली, स्पेन अशा दक्षिण युरोपातील जीवनशैली वेगळी असल्याने अशा ठिकाणी हे संकेतस्थळ यशस्वी होईल, असे या निर्मात्या बंधूंचे म्हणणे आहे आणि संकेतस्थळाची वाढती सदस्यसंख्या लक्षात घेता त्यांचा अंदाज खराच ठरल्याचे चित्र स्पष्ट होते आहे.